कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र लाटकर यांना विरोध झाल्याने उमेदवार पालटून मधुरिमाराजे छत्रपती यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत आवेदन प्रविष्ट केले. यानंतर आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबरला राजेश लाटकर यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे अखेर कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचे आवेदन मागे घेतले.
या प्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘राजेश लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी आवेदन मागे घेतले नाही. अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला आहे.’’ मधुरिमाराजे छत्रपती या खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या सून आहेत.
मधुरिमाराजे यांनी आवेदन माघारी घेतल्याने आमदार सतेज पाटील संतप्त !
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांचे उमेदवारी आवेदन मागे घेतल्याने काँग्रसचे आमदार सतेज पाटील प्रचंड संतप्त झाले. ‘‘असे करणे माझी फसवणूक केल्यासारखे आहे. असे करायचे होते, तर आधीच निर्णय घ्यायचा होता. असे करून मला तोंडघशी पाडण्याची काय आवश्यकता होती ? मी माझी शक्ती दाखवली असती. जेवढ्यांनी आग लावली त्यांना सगळ्यांना सांगतो.’’ अशी संतप्त प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.