‘इंडी’ (देशातील विरोधी पक्षांची आघाडी) आघाडीचे लोक ते निवडणूक जिंकत असल्याचे दावे करत आहेत. त्यांना किती जागा मिळणार ? याचे वाढते आकडे ते सांगत आहेत. हे सगळे हास्यास्पद ठरवून त्यांना मूर्खात काढण्याची घाई करू नका. खरा निकाल काय लागणार आहे ? हे त्यांनाही ठाऊक आहे; पण तरीही असे अतिरेकी दावे करण्यामागे एक मोठे षड्यंत्र असावे, असे जाणवत आहे. ‘निवडणुकीचे सगळे अंदाज ‘इंडी’ आघाडी जिंकणार, असे असतांनाही प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले’, याचा अर्थ भाजपने ढवळाढवळ करून निकाल पालटले’, असा कांगावा केला जाऊ शकतो. ‘हे खोटे निकाल आम्ही मानत नाही’, असे सांगून देशभर अराजकाची परिस्थिती माजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी काही ‘एक्झिट पोल’चे अंदाज ‘मॅनेज’ (कह्यात) केले जाऊ शकतात. बाकी ‘गोदी (मोदी) मीडिया’चे असल्याचे सांगून ते खोटे आहेत’, असे म्हटले जाऊ शकते.
देहलीतील शाहीन बाग, किसान आंदोलन यांच्या वेळी प्रदीर्घ काळ रस्ते कसे अडवून ठेवायचे, जगभरातील वलयांकित व्यक्तींना हाताशी धरून ‘ट्विटर स्टॉर्मस्’ (चर्चांची वादळे) कशी निर्माण करायची ?; न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी यांना कामाला लावून आंतरराष्ट्रीय दबाव कसा निर्माण करायचा ? याची ‘टेम्प्लेट’ सिद्ध झालीच आहेत. या वेळी ‘नाऊ ऑर नेव्हर’ (आता नाही, तर कधी नाही), अशी परिस्थिती असल्यामुळे हा प्रकार देशात अनेक ठिकाणी केला जाऊ शकतो. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस अन् ‘इकोसिस्टिम’ (विरोधकांची प्रणाली) आहेच. जॉर्ज सोरोसने ‘मोदींचे सरकार पाडण्यासाठी १ बिलियन डॉलर्सचा (८ सहस्र ३८३ कोटी रुपयांहून अधिक) निधी राखून ठेवत असल्याचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये जाहीरपणे सांगितले होते’, हे विसरून चालणार नाही. हे काहीतरी अतिशयोक्त चित्र रंगवले जात आहे, असे समजू नका. राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांनी ‘मोदीच येतील’, असा अंदाज व्यक्त करतांना ‘नंतर शाहीन बाग किंवा किसान आंदोलन यांसारखी आंदोलने होऊ शकतात’, असे विधान केले होते, तसेच काँग्रेसच्या राहुल गांधींनी नुकतेच ‘मॅच फिक्सिंगसारखा निकाल लागला, तर ‘देश में आग लगने जा रही है’, असे विधान करून काय होऊ शकते, याची झलक दाखवलीच आहे.
मोदीद्वेषाने आंधळे झालेली ‘स्युडो लिबरल इकोसिस्टिम’ (छद्म उदारवादी विरोधकांची प्रणाली) आणि घराणेशाहीच्या जहागिरी वाचवण्यासाठी इरेला पेटलेले राजकीय पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशा वेळी संपूर्ण देशाने स्वतःची एकजूट राखून असले देशविघातक डाव हाणून पाडले पाहिजेत. (३१.५.२०२४)
– श्री. अभिजित जोग, ‘डाव्यांची वाळवी’ या पुस्तकाचे लेखक, पुणे.