राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘मनुस्मृति’ जाळल्याच्या प्रकरणावर अनावृत्त पत्र

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रभावी कायदा करणे अपेक्षित !

जितेंद्र आ‘वाद’!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, एक असे नाव की, जे काम कमी आणि ‘वाद’च अधिक घालतांना दिसते. आज बातम्या वाचतांना दोन बातम्या वाचनात आल्या. दोन्ही तसे म्हणायला गेले, तर पुष्कळ साम्य असणार्‍या, नाही म्हटले, तर अगदी विरोधी ! पहिली जी सर्वांनीच दिवसभर दूरचित्रवाणीसंचावर पाहिली असेल, ती म्हणजे ‘जितेंद्र आव्हाडांनी महाड येथे मनुस्मृति जाळली !’ आणि दुसरी कदाचित् पुष्कळ चालली नाही, ती म्हणजे आव्हाडांनी ‘हमारे बारह’ या आगामी चित्रपटाला केलेला विरोध !

१. आव्हाड यांनी ‘मनुस्मृति’ जाळणे, ही समाजात तेढ निर्माण करण्याचीच कृती !

‘ऑनलाईन दैनिक लोकसत्ता’ वाचतांना ‘महिला मुले जन्माला घालणार्‍या मशीन्स नाहीत, ‘त्या’ चित्रपटावरून जितेंद्र आव्हाडांचा संताप’, असा मथळा पाहून जिज्ञासा निर्माण झाली आणि बातमी वाचून धक्काच बसला. या बातमीत आव्हाडांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आव्हाड म्हणाले, ‘‘सध्या आपल्याकडे नवीन पद्धत चालू झाली आहे. एका ठराविक धर्माविषयी चुकीचे काही तरी चित्रपटात दाखवायचे, त्याचा गवगवा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार चालला आहे.’’ असे आहे, तर मग २९ मे या दिवशी सकाळी आपण मनुस्मृति जाळण्याचा जो प्रकार केला, तो काय होता ? एका धर्मग्रंथाला (अभ्यास न करता) चुकीचे ठरवायचे आणि समाजात तेढ निर्माण करायची, हा तोच प्रकार नाही का ?

२. डॉ. आंबेडकर यांचे मनुस्मृतीविषयीचे मत मान्य करणार कि जातीवादासाठी सोयीस्कर भूमिका घेणार ?

बरं पुढे आव्हाड म्हणतात, ‘या चित्रपटात कुराणाचा वापर केला आहे; मात्र कुराणमध्ये लिहिलेल्या गोष्टी मोडून-तोडून सादर केल्या आहेत. कुराण आपल्यासमोर चुकीच्या पद्धतीने मांडले आहे. चित्रपटात जे दाखवले जात आहे, ते खोटे आहे; कारण कुराणमध्ये सांगितले आहे की, पतीने पत्नीखेरीज कुठेही जायचे नाही. एखाद्या दांपत्यामधील संबंध कसे असावेत ? हेही कुराणमध्ये सांगितले आहे. संभोग कसा करावा ? हेही त्यात सांगितले आहे. कुणी किती मुले-मुली जन्माला घालावी, हे त्यात सांगितलेले नाही.’ शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या (मुसलमानांच्या) कित्येक पिढ्या बरबाद झाल्याचे आपण पाहिले-वाचले आहे. तरीही तुम्ही लोक एखाद्या समाजाला कोपर्‍यात नेऊन किती मारणार आहात ? पुन्हा तोच मुद्दा जसे की, ‘तुम्ही कुराण मोडून-तोडून सादर केले म्हणता, तुम्ही मनुस्मृतीविषयीही तेच करत आहात. त्यातील श्लोक सतत मोडून-तोडून मांडत आहात. जे कुराणमध्ये लिहिले आहे सांगता, तशी एकदा मनुस्मृति वाचा. त्यातही समाजजीवनाशी निगडीत नियमच सांगितले आहेत.’ कुराण वाचायला वेळ आहे; पण तुम्हाला मनुस्मृति वाचायला वेळ नाही आणि बरं डॉ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ या दिवशी मनुस्मृति जाळली, त्यामागे त्यांची एक भूमिका होती; पण त्यांनीच ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात केलेले भाषण जे त्यांच्याच ‘समग्र भाषणे, खंड ८, पान १७-१८’ वर प्रकाशित झालेले आहे, ‘मी जाती निर्णयासाठी मनुस्मृतीचा, घटस्फोटासाठी पराशरस्मृतीचा आणि स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतिस्मृतीचा आधार घेतलेला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’

जितेंद्र आव्हाड

आव्हाड हे सोयीस्करपणे बाबासाहेबांनी मनुस्मृति जाळली; म्हणून मीही जाळणार, तर मग बाबासाहेबांनी मनुस्मृतीतीलच काही श्लोकांचा आधार राज्यघटना बनवतांना घेतला, हे मान्य करणार आहेत कि नाही ? तसेच त्यांनी मनुस्मृति आधी जाळली आणि नंतर त्यातील आधार घेतले, याचा अर्थ त्यांना नंतर त्यातील श्लोकांची उपयुक्तता लक्षात आली; म्हणूनच त्यांनी राज्यघटनेसाठी त्याचा आधार घेतला. हे समजायला आव्हाड एवढे मूर्ख नाहीत; पण त्यांना जातीयवादाचे विष कालवायचे आहे, त्यामुळे ते सोयीस्कर भूमिका घेतांना दिसतात.

३. आव्हाड यांनी डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडणे हे अपमानजनकच !

आव्हाड यांनी मनुस्मृति जाळतांना कहरच केला. मनुस्मृति जाळण्यासह त्यांनी डॉ. बाबासाहेबांचेच छायाचित्र फाडून फेकून दिले. नंतर सारवासारव करत क्षमाही मागितली; पण काय उपयोग ? डॉ. बाबासाहेबांचा काँग्रेसने पूर्वी अनेकदा अपमान केला होता; पण आव्हाडांनी केलेली ही कृती गेल्या ७० वर्षांतील डॉ. बाबासाहेबांचा सर्वांत मोठा आणि अत्यंत वाईट प्रकारे अपमान करणारी ठरली. हे एक प्रकारे ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः।’ (विनाशकाळ जवळ आल्यावर बुद्धी भ्रष्ट होते.), असेच म्हणावे लागेल.

४. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण’, या उक्तीप्रमाणे वागणारे जितेंद्र आव्हाड !

आव्हाड पुढे म्हणतात, ‘‘चित्रपटकर्त्यांनी असे काही तरी बनवण्यापूर्वी कुराण वाचायला हवे, पडताळायला हवे. असे काही तरी केल्यामुळे समाजात वितुष्ट निर्माण होते आणि यात देशाचे हित नाही. हे काही लोकांच्या लक्षात कसे येत नाही ? जनतेलाही समजले आहे की, हे सगळे केवळ राजकीय कारणांसाठी वापरले जात आहे.’’

आव्हाडसाहेब, हीच तुमची ४ वाक्ये जर तुम्हीच ४ वेळा ऐकली आणि पाठ केली, तर तुमच्याकडून यापुढे होणार्‍या घोडचुका तरी टळतील. कुराण वाचण्याचा सल्ला देता, मग तुम्ही मनुस्मृति का वाचत नाहीत ? तुमच्या अज्ञानामुळे समाजात वितुष्ट निर्माण का करत आहात ? मनुस्मृति जाळण्यात देशाचे हित नाही, हे तुम्हाला समजत नाही का ? आणि तुम्ही हे सगळे राजकीय कारणांसाठी का वापरता ? हे प्रश्न तुम्हीच आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारा.

अर्थात् ‘कुत्र्याची शेपूट सरळ होईल’, इतका काही मी भोळी आशा बाळगणारा नाही; पण काही हिंदूंनाही ‘मनुस्मृती’बद्दल पसरवलेल्या भ्रमामुळे आपल्याच धर्मग्रंथाविषयी काहीच वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हिंदु धर्म समजून घ्या. एकदा तरी मनुस्मृति खरेच वाचा. आव्हाडांसारखी मंडळी एक खोटे १०० वेळा सांगितल्याने ‘खरेच’ कसे आहे, हे दाखवून देण्यात माहिर आहेत, हे सांगण्यासाठी हा प्रपंच !

५. सर्व पंथांतील ग्रंथांची चिकित्सा करणार का ?

सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ‘कुराण वाचून त्याचे दाखले देऊन त्याविषयी कसे चुकीचे पसरवले जात आहे’, हे आव्हाड सांगत आहेत. यावर मी न बोललेलेच बरे; कारण जर धर्मग्रंथांमधील चुकीच्या किंवा हिंसात्मक गोष्टींविषयी चर्चा करायची असेल, तर मग सगळ्याच ग्रंथांना रांगेत उभे करा. प्रत्येक पंथाच्या पुस्तकांतील प्रत्येक ओळींचा अर्थ समाजासमोर आणा. त्यावर चर्चा घडवा. त्यातील योग्य-अयोग्य ठरवा. कोणता ग्रंथ संपूर्ण मानवजातीला आवश्यक आहे ? कोणता आवश्यक नाही ? याचा निष्कर्ष सर्वांसमोर ठेवा. त्यात जर ‘मनुस्मृति’ अयोग्य ठरली, तर तुम्हाला टीका करण्याचा नैतिक अधिकार असेल. तोवर ‘मनुस्मृती’वर अभ्यासहीन टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार झाला आहे आणि हे थांबले पाहिजे.

६. …हिंदूंनी सतर्क रहाणे महत्त्वाचे !

हिंदूंचा धर्मग्रंथ आज रस्त्यावर कुणीही येऊन जाळतो, बाबासाहेबांचे छायाचित्र फाडतो, त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. हे डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालते का ? या जागी अन्य कोणत्या पंथाचा ग्रंथ जाळल्याची साधी अफवा जरी पसरली असती, तर काय झाले असते, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. हिंदुत्वाचे राजकारण जोर पकडत आहे, त्यामुळे काही हा ‘वाद’ (आव्हाड) बोलणारच. त्यामुळे सतर्क रहा.

– एक मनुवादी (२९.५.२०२४)