निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काजू बियांविषयीचे धोरण स्वीकारले जाणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

श्री. दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

सावंतवाडी – निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर काजू बियांविषयीचे धोरण स्वीकारले जाणार आहे. काजू महामंडळ (बोर्ड) स्थापन करून पुढील वर्षी काजू खरेदीला प्राधान्य दिले जाईल. काजू उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना’ केवळ आग लावायचा धंदा करत आहे. आम्हाला ठाकरे गट ‘खोके’ (आर्थिक व्यवहाराला उपहासात्मक वापरलेला शब्द), ‘गद्दार’ म्हणून हिणवतो. आम्ही विचार पालटण्यासाठी ‘खोके’ घेतले असतील, तर सिद्ध करून दाखवा. मी राजकारणातून संन्यास घेईन, असे प्रत्युत्तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर टीका करणार्‍यांना दिले.

‘आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूसोबत तेथील शेतकर्‍यांची मतेही आयात करा !’, असा फलक काजू बागायतदारांनी शहरात लावल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता मंत्री केसरकर बोलत होते.

या वेळी मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘काजू बागायतदार शेतकर्‍यांचे फलक लावण्यात आले आहेत, तो ठाकरे गट शिवसेनेचा उद्योग आहे. असे उद्योग करून ठाकरे गट स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. काजू बागायतदार, शेतकरी आणि बागायतदार संघाचे प्रतिनिधी अन् कारखानदार यांच्यात समन्वय घडवून आणला आणि काजू दराविषयी निश्चिती केली. काजू बियांविषयी घेतलेल्या निर्णयावर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर कार्यवाही होईल.’’