पुणे येथे भविष्य निर्वाह निधीमध्ये ९ कोटी रुपयांचा अपहार !

बनावट कागदपत्रांद्वारे ८९ आस्थापनांची नोंदणी

पुणे – बनावट कागदपत्रांद्वारे ८९ आस्थापने (कंपन्या) स्थापन केली, कामगारांच्या नोंदी केल्या. ‘आत्मनिर्भर भारत योजने’तील कामगारांच्या नावे केंद्रशासनाकडून जमा करण्यात आलेल्या ९ कोटी ५६ लाख रुपयांच्या ‘भविष्य निर्वाह निधी’चा (‘पेन्शन’चा) अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ‘भविष्य निर्वाह निधी’ कार्यालयातील अधिकारी मनोजकुमार असरानी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

बनावट ८९ आस्थापनांची स्थापना करण्यासाठी निरनिराळी नावे, पत्ता दिला असून त्या सर्वांवर एकच भ्रमणभाष क्रमांकाची नोंद असल्याचे आढळून आले. केंद्रशासनाच्या ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’चा लाभ घेण्यासाठी आस्थापनांची तपशीलवार माहिती, कामगारांची संख्या आणि त्यांच्या नावांची नोंद करावी लागते. त्यानंतर आस्थापन आणि सरकारकडून प्रतिमाह ठराविक रक्कम कामगारांच्या नावे जमा करण्यात येते. गेली ४ वर्षे एकाच व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा आधार घेत ८९ आस्थापनांची नोंद केली असल्याचा प्रकार ‘भविष्य निर्वाह कार्यालया’तील अधिकारी राहुल कोकाटे यांच्या निदर्शनास आला. (४ वर्षे हा अपहार चालू असतांना कुणालाच त्याची कल्पना कशी आली नाही ? ही संबंधितांची अकार्यक्षमताच नव्हे का ? – संपादक)

भविष्य निर्वाह निधी संघटन, श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतंर्गत कोरोना संसर्ग काळात ज्यांची नोकरी गेली आहे किंवा ज्यांना काम मिळाले नाही, अशा श्रमजीवींना खासगी आस्थापनाने काम दिल्यास त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम केंद्र सरकार भरणार, अशी योजना मांडण्यात आली होती. १२ टक्के रक्कम सरकार भरणार, उर्वरित १२ टक्के रक्कम आस्थापनाकडून भरण्यात येणार, अशी योजना होती.