नृत्यसाधकांनी विज्ञानाची कास धरत कलासाधनेतील नवीन आयाम शोधावेत ! – डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

पुणे येथील ‘अटेंडन्स’ या नृत्य वार्षिक अंकाचे प्रकाशन !

पुणे – कला, विज्ञान आणि अध्यात्म या ज्ञानशाखा परस्परपूरक ठरू शकतात का ? नृत्यकला आणि वैज्ञानिक तथ्ये, उपकरणे यांचा मेळ घालून कलासाधनेला आणि सादरीकरणाला एक नवी मिती (दिशा) देता येईल का ? याचा विचार नृत्य साधकांनी गांभीर्याने करावा, असे आवाहन ज्येष्ठ संगणकतज्ञ आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिजात नृत्यकलेला समर्पित असलेल्या ‘अटेंडन्स’ या नृत्य वार्षिक अंकाच्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या उपस्थितीत झाले, त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. भटकर यांनी साध्या शब्दांमध्ये विज्ञान, कला आणि अध्यात्म यांचे अनुबंध उलगडले. ते म्हणाले की, नृत्यातील विज्ञान आणि कलापूरक वैज्ञानिक साधनांचा उपयोग नृत्य कलाकारांनी काही प्रमाणांमध्ये अंगिकारला आहे. अखंड प्रयोग, चिंतन, वैचारिक देवाणघेवाण आणि ज्ञानाची पुनरावृत्ती ही काही साम्यस्थळे विचारात घेऊन कलाकारांनी कला आणि विज्ञानाचे नवे आयाम शोधावेत. आता काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्यामुळे येत्या काळात ‘रोबोनृत्या’चीही शक्यता आहे. नृत्य कलाकारांनी काळाचे पालट स्वीकारत विज्ञानाची योग्य ती साथ घेत कलेचे क्षेत्र समृद्ध करावे.