सोलापूर – श्रीरामनवमीला येथील औराद गावाजवळ गोवंशियांची तस्करी करणार्या वाहनाचा पाठलाग करत असतांना गोरक्षकांच्या वाहनाचा अपघात घडवून आणून त्यांच्यावर वाहनचालकाने प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. घायाळ अवस्थेतही गोरक्षकांनी स्थानिक पोलीस आणि इतर गोरक्षक यांच्या साहाय्याने सदर वाहन कह्यात घेतले. यानंतर या गाडीतील ७ गोवंशियांची सुटका करण्यात आली. या कारवाईत बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी, बजरंग दल गोरक्षक श्री. वीरेश मंचाल, बजरंग दल मंद्रूप प्रखंडप्रमुख श्री. रवी म्हेत्रे, गोरक्षक श्री. अनिकेत गोरट्याल आणि श्री. विवेक वंगारी सहभागी झाले होते.
या प्रकरणी पसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात प्राणीछळ प्रतिबंधक अधिनियम ११ (१), भा.दं.वि. १८६० अंतर्गत कलम ४२७, ५०४, ५०६, तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत १७७, ८३ आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम ९ अंतर्गत गुन्ह्यांची नोंदवण्यात आली आहे.
गोतस्करीच्या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा परवाना रहित करावा ! – प्रशांत परदेशी, मानद पशूकल्याण अधिकारी महाराष्ट्र राज्य
गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित करण्यात यावी. आता गोहत्या मुक्तीकडे वाटचाल करत आहोत. या प्रयत्नांना नक्कीच प्रभु श्रीराम आशीर्वाद देतील. श्रीरामनवमीच्या दिवशी गोवंशियांची सुटका करण्याची सेवा आम्ही प्रभु श्रीरामांच्या चरणी अर्पण करतो. (जिवावर उदार होऊन गोवंशियांची सुटका करण्यासाठी प्रयत्नशील सर्व गोरक्षकांचे अभिनंदन ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|