पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या विविध विभागांतील प्राध्यापक पदाच्या १११ जागांसाठी ५ सहस्र ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ३८ अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली. उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या पहाता प्राध्यापक भरतीमध्ये मोठी स्पर्धा असेल. पुणे विद्यापिठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत होती, तर २९ फेब्रुवारीपर्यंत अर्जाची प्रत विद्यापिठांमध्ये जमा करण्याची मुदत होती. साडेपाच सहस्र अर्ज आल्यामुळे अर्जाच्या छाननी प्रक्रियेसाठीसुद्धा बराच कालावधी लागेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली, तरीही या कालावधीत अर्जाची छाननी आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली भरतीची पुढील प्रक्रिया अमलात आणली जाईल,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी सांगितले.