सातारा येथे ‘राजधानी महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन !

सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक संचालनालय आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातारा येथे ‘राजधानी महासंस्कृती महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत श्री शाहू कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

या महोत्सवात फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर आणि सातारा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवव्याख्यान, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, जागर लोककलेचा, विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक प्रवेश सादरीकरण, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, मैदानी खेळांची प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत श्री शाहू कला मंदिर परिसरात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मैदानावर ‘राजधानी गौरव सोहळ्या’चे आयोजन केले आहे.