संपादकीय : पूनम हिची निषेधार्ह जागृती !

पूनम पांडे

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून ओळख असलेली पूनम पांडे हिच्या आकस्मिक मृत्यूची बातमी १ दिवसापूर्वी आली अन् देशभरातील अनेकांना धक्का बसला. तिला ‘सर्व्हायकल कॅन्सर’ (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती. पूनम पांडे ही अभिनयापेक्षा काहीतरी विवादास्पद करणारी, अश्लील चित्रपट करणारी, तोकडे कपडे घालणारी तरुणी म्हणून (कु)प्रसिद्ध आहे. एखाद्याचे उपद्रव मूल्य असले, तरी त्या व्यक्तीची माध्यमांमध्ये अधिक चर्चा होते. देशभरातील मोठ्या पत्रकारांनी त्यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमाद्वारे ‘तिचा मृत्यू कसा झाला ?’, तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय पत्रक इत्यादी गोष्टी प्रसिद्ध केल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला की, तिचा मृत्यू खरोखरंच झाला आहे. परिणामी हिंदी चित्रपटसृष्टी, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांनी तिच्या निधनानिमित्त तिच्याविषयी २ शब्द सांगून हळहळ व्यक्त केली. ‘ती कशी होती ?’, ‘तिचा एवढ्या तरुण वयात मृत्यू का झाला ?’, याविषयी चर्चा होऊ लागली. ‘तिच्याप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि अन्य कर्करोग होऊ नये; म्हणून कोणती लस दिली पाहिजे ?’, ‘कसा आहार घेतला पाहिजे ?’, ‘काय टाळले पाहिजे ?’, याची चर्चा होऊ लागली. सामाजिक माध्यमांवर तसे संदेश प्रसारित होऊ लागले. तज्ञ मंडळींचे याविषयी समुपदेशन इत्यादी सर्व सावळागोंधळ चालू झाला. तिच्या कुटुंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचाही संपर्क होत नसल्याचे आणि ते कुठे तरी दूर गेल्याच्या बातम्या आल्या. तिच्या जवळच्यांनाही तिच्या निधनाविषयी माहिती नव्हती. त्यामुळे दु:ख, आश्चर्य आणि संशय यांचे वातावरण पूनम पांडे हिच्या मृत्यूभोवती निर्माण झाले.

पूर्ण १ दिवस देशाला रडवून पूनम पांडे ही एकाएकी सर्वांसमोर एका व्हिडिओद्वारे उपस्थित झाली. त्या वेळी, ‘माझ्यामुळे अनेकांना मन:स्ताप झाला; मात्र ‘सर्व्हायकल कॅन्सर’विषयी मला जागृती करायची असल्याने असे केले’, असे तिने सांगितले. पूनम पांडे हिच्या या प्रसिद्धीच्या ‘स्टंट’वर देशभरातून टीका होत आहे. प्रसिद्धीसाठी एखादी युवती किती खालच्या पातळीला जाऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. ही लोकांची जाणूनबुजून केलेली फसवणूकच आहे. पूनम पांडे हिने केलेली कृती ही सामाजिक भान नसणे आणि तीव्र असंवेदनशीलता यांचे द्योतक आहे. लोकांच्या भावनांचा असा खेळ करणार्‍याला खरे तर पोलिसांनी पकडून कठोर शिक्षा केली पाहिजे. जेणेकरून पुन्हा अन्य कुणी अशी चूक करण्याचा विचारही करणार नाही.

अशा अफवा पसरवण्याचे प्रकार देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातही घडतांना दिसतात.  एखाद्या ठिकाणी बाँब ठेवल्याचा खोटा दूरभाष काही विकृत वा धर्मांध लोक थेट पोलीस ठाण्यातच करतात आणि नंतर मन:स्थिती ठीक नसल्याचे सांगतात. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांचा मात्र जीव टांगणीला लागतो, त्याचे काय ? गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागृतीच करायची होती, तर पूनम पांडे हिच्याकडे अन्य पर्याय उपलब्ध नव्हते का ? स्वत: स्वैर आचरण करणार्‍यांनी अशा स्वरूपाच्या आजारांविषयी जागृती करणे, हे निव्वळ हास्यास्पद आहे. एकूणच पूनम पांडे हिच्यावर कठोर कारवाई होणे भारतियांना अपेक्षित आहे.