छत्रपती संभाजीनगर येथील बँकांत अडकलेले पैसे मागणार्‍या ठेवीदारांवर पोलिसांचा लाठीमार !

पैसे बुडण्याची भीती असल्याने ठेवीदार संतप्त !

छत्रपती संभाजीनगर – डबघाईस आलेल्या अनेक बँका आणि पतसंस्था यांमध्ये सहस्रो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. सरकारने आश्वासने देऊनही आयुष्यभराची ही कमाई परत मिळू शकलेली नाही. त्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ठेवीदारांनी ३० जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ‘आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी बाहेर येऊन निवेदन घेऊन चर्चा करावी’, अशी आंदोलकांची मागणी होती; मात्र दालनाबाहेर येण्यास आयुक्तांनी नकार दिला. पोलीस आणि इतर अधिकारी यांनी अनेकदा मनधरणी केली; पण आयुक्तही भूमिकेवर ठाम होते. अखेर संयम सुटलेल्या ठेवीदारांनी पोलिसांचे सुरक्षाकडे भेदून आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या २ नळकांड्या फोडून आणि लाठीमार करत जमावाला पांगवले. आंदोलक आणि पोलीस यांच्यातही झटापटही झाली. त्यामुळे परिस्थिती चिघळली.