पुणे – महापालिकेवर प्रशासक म्हणून काम करतांना आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे; मात्र विक्रम कुमार त्यांच्या कार्यकाळात लोकशाहीदिन बंद पडला असून जनता दरबार घेण्यास त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळेच शहरातील समस्याही त्यांना सोडवता आल्या नाहीत; म्हणून ‘कार्यकाळ पूर्ण झाल्याने विक्रम कुमार यांचे तातडीने स्थानांतर करा’, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने गेल्या दीड वर्षापासून आयुक्तांच्या माध्यमातून शहरात कामे केली जात आहेत.
लोकप्रतिनिधी नसतांना जनताभिमुख कार्य करण्याचे, तसेच रेंगाळलेले प्रश्न सोडवण्याचे दायित्व आयुक्तांचे आहे; मात्र आयुक्तांना जनतेला भेटण्यासाठी वेळ नाही. शहरातील महत्त्वाचे प्रश्न, बी.आर्.टी. मार्ग, जायका प्रकल्प, वाहनतळ समस्या, सायकल ट्रॅक यासंदर्भात प्रशासक काळात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे विक्रम कुमार यांचे स्थानांतर करून जनताभिमुख अधिकार्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी संभूस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.