सांगली, ३० डिसेंबर (वार्ता.) – राज्यात अनेक नाट्यगृहे उभारण्यात आली आहेत; मात्र या नाट्यगृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. राज्यशासन आता कोट्यवधी रुपये व्यय करून ७० नवीन नाट्यगृहे उभारणार आहे; मात्र नवीन समवेत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनरुज्जीवित करावे, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते आणि नाटककार प्रशांत दामले यांनी येथे केली. सांगली येथे १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
प्रशांत दामले पुढे म्हणाले की, आम्ही पुष्कळ भाग्यवान आहोत. आमच्या पाठीशी मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आहेत. सर्व राजकारणी हे नाट्यवेडे आहेत. गेल्या ४० वर्षांत इतक्या पद्धतीची नाट्यगृहे पहिली आहेत. त्यांची दुरुस्ती न झाल्याने ती अडगळीत आहेत. जी बांधली, त्यांची प्रथम दुरुस्ती करावी. नाट्य संमेलनाला महाराष्ट्र शासनाने साहाय्य केले आहे. हा राजाश्रय मिळाल्यानंतर कलाकारांचेही दायित्व आहे. त्यांनी पैसे दिले म्हणून उडवायचे नाहीत. ते मी होऊ देणार नाही. मुंबई येथे मुले काहीतरी बनण्यासाठी येतात; मात्र त्यांची रहाण्याची सोय नाही. रवींद्र नाट्यमंदिर पडल्यापासून रहाण्याची सोय नाही. मुलांची रहाण्याची सोय करण्याचे प्रयोजन नाट्य परिषदेचे आहे.