कुसूंबी (जिल्हा सातारा) येथील श्री काळेश्वरीदेवीचे मंदिर १ मास रहाणार बंद !

श्री काळेश्वरी

सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र कुसूंबी येथील श्री काळेश्वरीदेवीचे मंदिर १ मास बंद रहाणार आहे. श्री काळेश्वरीदेवीच्या मूर्तीला वज्रलेप विधी या काळात पार पडणार आहे, अशी माहिती श्री काळेश्वरीदेवी ट्रस्टचे विश्वस्तांनी दिली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या कुसूंबी गावातील श्री काळेश्वरीदेवीचे मंदिर भाविकांसाठी २८ डिसेंबरपासून १ मासासाठी बंद रहाणार आहे. याकाळात श्री काळेश्वरीदेवीच्या वज्रलेपाचा विधी पार पडणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी २९ डिसेंबर या दिवशी मंदिरात होमहवन होणार असून या वेळी देवीचे देवत्व कलशात स्थापन करण्यात येणार आहे. या कलशाचे दर्शन भाविकांसाठी खुले रहाणार आहे; मात्र मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात भाविकांना प्रवेश मिळणार नाही. वज्रलेपाचा विधी १७ जानेवारीपर्यंत चालू रहाणार आहे. यानंतर १८ जानेवारीपासून श्री काळेश्वरीदेवीच्या मूर्तीच्या पुनर्स्थापनेचा विधी पुढील ५ दिवस चालणार आहे. वज्रलेपाच्या काळात श्री काळेश्वरीदेवीच्या मंदिरात प्रतिदिन सकाळी ८ ते रात्री ८ या काळात मंत्रजप चालू रहाणार आहे, अशी माहिती श्री काळेश्वरीदेवी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे.