वडगाव – मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता सुतार यांना ‘राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रांत समाजासाठी अपवादात्मक समर्पण, वचनबद्धता आणि महत्त्वपूर्ण योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. सुनीता सुतार यांना या वर्षीचा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात महाराष्ट्रातील १७ सरपंचांची निवड केली होती. त्यामध्ये गावातील उत्कृष्ट कामगिरी, व्यवस्थापन, कार्यवाही, ग्रामपंचायत कार्याची माहिती आदींचा समावेश केला होता. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुतार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.