गोव्याभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट : ‘सनबर्न’ला थारा नकोच !

नुकतेच सावर्डे, गोवा येथे सामोसा विकणार्‍या युनूस नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांनी ३५ सहस्र रुपये किमतीचे ‘हॅश ऑईल’ (अमली पदार्थ ) जप्त केलेे. मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत. यावरून अमली पदार्थांचे लोण गोव्यातील ग्रामीण भागांतही पोचल्याचे सिद्ध झाले आहे. गोव्यात अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात काही विदेशींसह भारताच्या इतर राज्यांतील व्यक्ती आणि काही गोमंतकीय तरुण यांना अटक केल्याचे पोलीस अहवालातून स्पष्ट झाले आहे. गोव्यातील युवा पिढी अमली पदार्थाच्या आहारी गेली आहे.

संकलक : श्री. उमेश नाईक, उपसंपादक, दैनिक सनातन प्रभात, गोवा

१. गोव्यातील सुशिक्षित मुलेही अमली पदार्थांच्या आहारी !

‘नुकतेच इटालियन पाश्‍चात्त्य गायक (डीजे) गोव्यात आले होते. त्यांनी अमली पदार्थ समवेत आणल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. पणजी शहरात गांजा आणि इतर अमली पदार्थ बाळगणार्‍या टोळ्या कार्यरत असल्याचे अन्य एका घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. कांपाल, पणजी येथे गांजाची नशा करून अल्पवयीन मुलांमध्ये नुकताच मारहाणीचा प्रकार घडला. पणजी शहरात रात्रीच्या वेळी अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे चौकशीअंती आढळून आल्याचे पणजीच्या एका माजी महापौरांनी सांगितले. पणजी, म्हापसा आणि मडगाव येथील न्यायालयांत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. गोव्यातील सुशिक्षित मुलेही अमली पदार्थांच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत.

‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एन्.सी.बी.) गोव्याच्या पथकाने सापळा रचत विविध शहरांतून ९ अमली पदार्थ तस्करांना नुकतीच अटक केली. या तस्करांकडून १३५ कोटी रुपये किमतीचे अनुमाने २०६ किलो ‘कोकेन’ आणि ‘अल्प्राझोलम’ हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

श्री. उमेश नाईक

२. अमली पदार्थ माफियांना रोखा !

गोव्यात पर्यटन हंगामात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने जगभरातून पर्यटक गोव्यात येतात. यांपैकी काही अमली पदार्थ तस्करही असतात. ‘सनबर्न’, पाश्‍चात्त्य गायक (डीजे) यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात गोव्यात येतात. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने अमली पदार्थ माफियांना रोखले नाही, तर गोव्याला पडलेला अमली पदार्थांचा विळखा घट्ट होण्यास वेळ लागणार नाही.

३. कॅसिनो, सनबर्न यांसारख्या वासनायुक्त आकर्षणांमुळे गोव्याचा र्‍हास !

गोव्याची अनेक वर्षांपासून ‘बीच (समुद्रकिनारे), बाई आणि बाटली (मद्य)’ अशी चुकीची ओळख जगभरात निर्माण झाली आहे. त्यामध्ये ड्रग माफिया, कॅसिनो आणि हॉटेल लॉबी (उपाहारगृह व्यावसायिक) यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोव्याच्या र्‍हासाला कॅसिनो आणि सनबर्न यांसारखी आकर्षणे कारणीभूत ठरत आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांतील विज्ञापनांच्या माध्यमातून युवा पिढीला याकडे आकर्षित केले जात आहे. परिणामी कॅसिनो आणि सनबर्न यांसारख्या वासनायुक्त आकर्षणाला गोव्यातील युवा पिढी बळी ठरत आहे.

४. युवा पिढीला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी गोव्यातील समाजधुरिणांनी पुढाकार घ्यावा !

गोवा उत्सवप्रिय प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे अनेक उत्सव राज्यपातळीवर साजरे केले जातात. जगभरातील पर्यटक त्यातील आनंद अनुभवण्यासाठी उपस्थित रहातात. यामध्ये शिमगोत्सव, दीपावली यांसारखे उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करण्याची गोव्याची परंपरा आहे; परंतु सध्या हे उत्सव विकृतीने ग्रासले आहेत. या उत्सवांमध्ये अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे. हे अपप्रकार युवा पिढीला बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत. एकेकाळी समाजाला आनंद देणारे हे उत्सव आता सर्वसामान्य जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. गोव्यातील समाजधुरिणांनी याची वेळीच नोंद घेऊन युवा पिढीला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी, तसेच सार्वजनिक उत्सवांतील अनिष्ट प्रकार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

५. भगवान परशुरामनिर्मित पवित्र गोमंतभूमीचे रक्षण करा !

अमली पदार्थ, मद्य, जुगार यांच्या आहारी गेलेले तरुण गुन्हेगारीकडे वळतांना दिसत आहेत. अमली पदार्थ, दारू, जुगार यांना मोकळीक देणे म्हणजे अजगराला गोंजारण्यासारखे आहेे. उद्या तो अजगर गोव्याला गिळंकृत केल्याविना रहाणार नाही. परशुरामभूमीने कात टाकली पाहिजे. पर्यटनाच्या नावाखाली अयोग्य गोष्टींना प्रोत्साहन दिल्यास ते राज्याच्या अंगलट येऊ शकते. गोव्यातील विविधतेने नटलेला समाज, गोव्याचे निसर्गसौंदर्य, गोव्याची संस्कृती आणि भगवान परशुरामनिर्मित ही पवित्र गोमंतभूमी यांचे रक्षण अन् जोपासना गोव्यातील राज्यकर्ते, समाजसेवक आणि जागरूक नागरिक यांनी करणे आवश्यक आहे.’