पुणे – येथील ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट’चे (पूर्वीचा ओशो किंवा-रजनीश आश्रम) संचालन करणार्या ‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’ला (ओ.आय.एफ्.ला) कोरेगाव पार्क या उच्चभ्रू परिसरातील ९ सहस्र ८०० चौरस मीटरच्या २ भूखंड विक्रीसाठीची अनुमती नाकारण्यात आली आहे. या भूखंडांची उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला (ट्रस्ट) १०७ कोटी रुपयांना विक्री होणार होती; मात्र ओशोंच्या शिष्यांच्या बंडखोर गटाने या व्यवहारास तीव्र आक्षेप घेतला होता. ‘ओ.आय.एफ्.’चे विश्वस्त आध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमरूपी वारशाला धक्का पोचवण्याचा प्रयत्न करत आहे’, असा या गटाचा आरोप आहे. मुंबईतील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने या संदर्भातील अर्ज नाकारला आहे.
सहधर्मादाय आयुक्त आर्.यू. मालवणकर यांनी ७ डिसेंबरला दिलेल्या आदेशात ‘राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्ट’कडून मिळालेली ५० कोटीं रुपयांची आगाऊ रक्कम (इसारा) व्याजाविना परत करावी, असे नमूद केले आहे.