(इंटरसेप्टर वाहन म्हणजे वाहनाची गती ओळखणारे वाहन)
नाशिक – समृद्धी महामार्गावर अतीवेगामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी आता नागपूर ते भरवीर (नाशिक) या ६०० कि.मी. मार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या वाहनांवर लक्ष ठेवून त्याविषयी पोलिसांना कल्पना देणार आहेत. नियमाचे उल्लंघन करणार्यांकडून ऑनलाईन दंड वसूल केला जाईल. अपघातांच्या माहितीसाठी ‘सेंट्रल कंट्रोल रूम’ही स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस यांसह इतर यंत्रणांना अपघाताची सूचना दिली जाणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्यास ही यंत्रणा काम करेल.
महामार्ग सुरक्षा विभागाचे अपर महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राज्यातील १५ महामार्गांसाठी असा प्रस्ताव दिला होता. पुढील टप्प्यात हा उपक्रम राज्यातील इतर महामार्गांवर राबवण्यात येणार आहे. महामार्गावर सुरक्षेसाठी २१ शीघ्र प्रतिसाद वाहने, २१ ई.पी.एस्. गस्त वाहने, १४ महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र, ३० टन क्षमतेची क्रेन, सुरक्षा मंडळाचे १४२ सुरक्षारक्षक आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.