सनातन हिंदु धर्म संपुष्‍टात आणणे खरेच शक्‍य आहे का ?

‘नुकतीच तमिळनाडूमध्‍ये सनातन धर्माचा समूळ विनाश करण्‍यासाठी एक सभा आयोजित करण्‍यात आली होती आणि याला तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री उपस्‍थित होते. त्‍यांच्‍या उपस्‍थितीत त्‍यांचे सुपुत्र (क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन) यांनी सनातन हिंदु (सनातन) धर्म नष्‍ट करण्‍याचे आवाहन केले. थोडक्‍यातच सांगायचे, तर समग्र जगाचा विनाश करण्‍याचे आवाहन केले. हे वाचतांना ही जरी एक अतिशयोक्‍ती वाटत असली, तरीही प्रत्‍यक्षात ही अत्‍यंत सत्‍य गोष्‍ट आहे; कारण ‘सनातन काय आहे ?’, हे समजून घेतले, तर या अतिशयोक्‍ती वाटणार्‍या वाक्‍याचा मतितार्थ आपणास कळेल. सत् आणि अनंत अर्थात् सत्‍य अन् ज्‍याला अंत नाही, असा तो; या दोन शब्‍दांपासून बनलेला शब्‍द म्‍हणजे ‘सनातन’ होय. आता लक्षात आले असेल की, ज्‍याला अंत नाही, असा तो जर सनातन असेल, तर हा सनातन हिंदु धर्म संपुष्‍टात कसा येईल ?

१. सनातन हिंदु धर्म हा संपूर्ण जग, सौरमंडळ आणि ब्रह्मांड यांना व्‍यक्‍त करणारा धर्म !

ब्रह्मा मुरारिस्‍त्रिपुरान्‍तकारी भानु: शशी भूमिसुतो बुधश्‍च ।
गुरुश्‍च शुक्र: शनिराहुकेतव: कुर्वन्‍तु सर्वे मम सुप्रभातम् ॥

अर्थ : निर्माता ब्रह्मदेव, पालनकर्ता (‘मुर’ या दानवाचा वध करणारा) श्रीविष्‍णु अन् संहारक (‘त्रिपूर’ राक्षसाचा वध करणारा) शिव हे प्रमुख ३ देव आणि सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु अन् केतु हे नवग्रह माझी सकाळ शुभ करोत.

डॉ. कुलदीप शिरपूरकर

असा सहस्रो, लाखो वर्षांपूर्वी ब्रह्मांडातील आपली पृथ्‍वी असलेल्‍या आकाशगंगेतील सूर्यमालेचे वर्णन करणारा श्‍लोक शिकवणारा हा धर्म आहे. हा नुसताच धर्म नाही, तर ज्ञान, बुद्धी, विज्ञान, आदर्श परंपरा आणि नीतीमत्ता यांचा अनोखा संगम आहे. जगात असे काहीच नाही, जे सनातन धर्मात नाही, तर मग आता हिंदु धर्मास संपूर्ण नष्‍ट करण्‍यास निघालेल्‍या थोर व्‍यक्‍तींना हे समजून घेण्‍याची आवश्‍यकता आहे की, ते विनाश नेमका कशाचा करणार आहेत ? संपूर्ण मानवजातीचा ? कि या ब्रह्मांडाचा ? या ग्रहतार्‍यांचा ? जीवन देणार्‍या सूर्याचा ? कि श्‍वासामधून शरिरास ऊर्जा प्राप्‍त करून देणार्‍या प्राणवायूचा ? देशाला पाणी मिळवून देणार्‍या गंगा, जमुना, सरस्‍वती, नर्मदा या नद्यांचा ? कि भारताचे संरक्षण करणार्‍या हिमालयाचा ? कारण या सर्वांचेच हिंदु धर्मात सविस्‍तर वर्णन मिळते. या सर्वांवरच आधारित सनातन हिंदु धर्म आहे, तर मग विनाश कशाचा करणार ?

हाच हिंदु धर्म प्राणायाम शिकवतो, ज्‍याद्वारे शरिरातील ऑक्‍सिजनची पूर्तता योग्‍य प्रकारे करण्‍याचे वैज्ञानिकरित्‍या नियोजन केले जाते. याचा विनाश करणार का ? याच सनातन धर्माने सूर्याची पूजा करण्‍यास सांगून सूर्यनमस्‍कारासारखा जगाने सर्वश्रेष्‍ठ मानलेला, सर्वांगीण शक्‍ती प्रदान करून देणारा व्‍यायाम जगाला दिला आहे. याचा विनाश करणार ? अर्थात् स्‍वतःच्‍या शरिराचाच विनाश करणार का ?

ॐ भूर्भुवः स्‍वः । ॐ तत्‍सवितुर्वरेण्‍यं भर्गो देवस्‍य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।

अर्थ : दैदीप्‍यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्‍या त्‍या तेजाचे आम्‍ही ध्‍यान करतो. ते (तेज) आमच्‍या बुद्धीला प्रेरणा देवो.

हा फक्‍त मंत्र नव्‍हे, तर पंचमहाभूतांची शक्‍ती या देहात आत्‍मसात करून घेण्‍याची इच्‍छा प्रकट करणारा मंत्र आहे. यात पृथ्‍वी, जल (आप), अग्‍नी (तेज), वायू अन् आकाश या पाच महाभूतांचा उल्लेख आहे. यांनाही नाकारणार का ? आणि तुम्‍ही नाकारले, तरीही त्‍यांचे अस्‍तित्‍व नष्‍ट होणार आहे का ?

सनातन हिंदु धर्माचे हेच वैशिष्‍ट्य आहे की, हा धर्म संपूर्ण जगाला, सौरमंडळाला आणि ब्रह्मांडाला व्‍यक्‍त करणारा धर्म आहे. त्‍यामुळे तो सतत आहे, अनंत आहे, तो नष्‍ट करता येत नाही आणि स्‍वतःहून कधी दुसर्‍याला नष्‍ट करण्‍याचा विचारही करत नाही; परंतु या सृष्‍टीने जन्‍माला घातलेल्‍या प्रत्‍येक जिवाला दिलेल्‍या मूलभूत अधिकारांचे जेव्‍हा जेव्‍हा अन्‍यायकारकरित्‍या हनन होईल, अत्‍याचार होऊ लागतील, तेव्‍हा तेव्‍हा

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्‍कृताम् ।
धर्मसंस्‍थापनार्थाय सम्‍भवामि युगे युगे ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ४, श्‍लोक ८

अर्थ : सज्‍जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्मस्‍थापना यांसाठी मी प्रत्‍येक युगात पुनःपुन्‍हा अवतार घेतो.

या सनातन हिंदु धर्माच्‍या श्रेष्‍ठ अशा भगवद़्‍गीतेतील श्‍लोकात सांगितल्‍याप्रमाणे ईश्‍वरी शक्‍ती जनमानसात संचारित होईल आणि ती सत् अन् अनंत अशा सनातन धर्माचा नाश करू पहाणार्‍या अत्‍याचारी अन् अन्‍यायकारी शक्‍तीचा विनाश करील. हे आजपर्यंत होत आले आहे आणि हे पुढेही नक्‍कीच होणार.

२. रामराज्‍याचा पुरस्‍कार, तसेच दुष्‍ट आणि अन्‍यायकारी रावणास नष्‍ट करणारा सनातन हिंदु धर्म !

जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून देणारा हाच सनातन हिंदु धर्म आहे आणि आवश्‍यकता पडल्‍यास महाप्रलयकारी घटना घडवून अन्‍यायकारी, अत्‍याचारी, दुष्‍ट शक्‍तींचा विनाश करण्‍यास समर्थन देणाराही हाच सनातन हिंदु धर्म आहे. सर्व समाजाला एकत्रित करून सर्वांचेच कल्‍याण कसे होईल, असे उदात्त उदाहरण प्रस्‍तुत करणारा आणि रामराज्‍याचा पुरस्‍कार करणारा हाच सनातन धर्म आहे, तर दुष्‍ट अन् अन्‍यायकारी रावणास नष्‍ट करणारा हाच सनातन धर्म आहे.

जगातील सर्वांत श्रेष्‍ठ राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण शिकवणारा, हाच सनातन हिंदु धर्म आहे. धार्मिक शिक्षणामध्‍ये संपूर्णतः विज्ञान शिकवणारा, हाच तो सनातन हिंदु धर्म आहे, ज्‍यामध्‍ये मानवी मूल्‍यांना सर्वाधिक महत्त्व असून निसर्गशक्‍ती हीच सर्वांत मोठी शक्‍ती आहे, असे मानले जाते. पूर्णतः वैज्ञानिक आधारावर निर्माण झालेले सनातन हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान हे कधीच नाकारता येण्‍यासारखे नाही.

हिंदु धर्मशिक्षणामध्‍ये गणित, विज्ञान, शरीरशास्‍त्राचे ज्ञान देणारा आयुर्वेद आहे, युद्धशास्‍त्राचे ज्ञान देणारा अथर्ववेद आहे, गायन-वादन कलेचे ज्ञान देणारा सामवेद आहे. असंख्‍य दुष्‍प्रवृत्तींचा विनाश कसा झाला ? आणि जनकल्‍याणकारी शांतीप्रिय धर्माचा आधार असलेले शासन कसे अस्‍तित्‍वात आले ? हे सांगणारा महाभारत यात आहे. माणसाला सर्वांत प्रथम हवेत उडण्‍याचे तंत्र शिकवणारा विमानशास्‍त्र ग्रंथ यात आहे. हाच तो सनातन हिंदु धर्म आहे, जो वटवृक्ष आणि कासव यांचीही पूजा करतो. नागांचीही पूजा करतो आणि मनुष्‍याला देवत्‍व प्राप्‍त करून देतो. निसर्गातील शक्‍तींचे मनुष्‍यरूपात पूजन करून तिच्‍या शक्‍तीचा गहन अभ्‍यासही करतो.

हिंदु धर्म कधी कुणाचा अनावश्‍यक विनाश करण्‍याची शिकवण देत नाही, त्‍या सनातन हिंदु धर्माचा विनाश तरी कसा होऊ शकतो ? सूर्याकडे बघून थुंकले, म्‍हणजे सूर्यावर थुंकल्‍यासारखे होत नाही. त्‍या थुंकीचे काय होते, हे आपण सर्वजणच जाणतो. असा तो सनातन हिंदु धर्म आहे, जो आजही नवग्रहांची पूजा करतो आणि याच चंद्रावर, सूर्यावर अन् मंगळावर पाठवण्‍यात येणार्‍या यानांच्‍या प्रक्षेपणाची प्रेरणाही देतो अन् त्‍याच्‍या सुखरूप ‘लँडिंग’साठी (अवतरणासाठी) यज्ञ, याग आणि पूजा करतो. चंद्राला देवस्‍वरूपात पुजले जात असले, तरीही चंद्र हा पृथ्‍वीचा उपग्रह आहे, हे लाखो वर्षांपासून सनातन हिंदु धर्मातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला ज्ञात आहे आणि त्‍यामुळेच चंद्रावर पोचलेल्‍या यानाच्‍या पाऊलखुणा पाहून हाच सनातन हिंदु धर्म मानणारा वर्ग सर्वाधिक हर्षित, उल्‍हसित अन् आनंदित झाला. संपूर्ण जगातील सनातन हिंदु धर्म हा एकच असा धर्म आहे की, जो कोणत्‍याच इतर धर्मांना आपला शत्रू मानत नाही, तर समाजावर अन्‍याय करणार्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीस शत्रू मानतो.

३. सनातन हिंदु धर्मावर प्रहार करणार्‍यांना सडेतोड उत्तर देणे, ही काळाची आवश्‍यकता !

हिंदु धर्मावर टीका करणार्‍या इतर धर्मांचे मूळ शोधले, तर लक्षात येईल की, हे सर्व धर्म कालांतराने विशिष्‍ट परिस्‍थितीमध्‍ये आणि विशिष्‍ट व्‍यक्‍तीने ते निर्माण केलेले आहेत अन् त्‍यांचा मुख्‍य उद्देश ‘साम्राज्‍यवाद’ हा आहे. स्‍वतःचा प्रचार, प्रसार करून अनुयायी वाढवणे, हाच त्‍यांचा एकमेव उद्देश आहे आणि यासाठी ते कोणत्‍याही थराला जाऊ शकतात. काही धर्मांनी हुकूमशाहीच्‍या जोरावर धर्म परिवर्तन घडवून आणले, तर काहींनी धनाच्‍या आमिषाने धर्मांतर घडवून आणले; परंतु सनातन हिंदु धर्म हा या सृष्‍टीच्‍या उत्‍पत्तीपासून या सृष्‍टीच्‍या लयापर्यंत अस्‍तित्‍वात रहाणारा धर्म आहे.

या सृष्‍टीला, निसर्गालाच मूलतत्त्व मानणारा हा हिंदु धर्म सर्वांनाच आपले मानतो; म्‍हणूनच ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ (संपूर्ण पृथ्‍वी हे एक कुटुंब आहे.) मानत स्‍वतःहून कधी इतर धर्मियांवर अन्‍याय आणि अत्‍याचार करत नाही. झोपलेल्‍या सिंहाच्‍या अंगावर उड्या मारणार्‍या उंदराला तो सिंह म्‍हणजे षंढ वाटतो आणि स्‍वतःलाच सिंहाचाही राजा समजू लागतो; परंतु वेळ आल्‍यावर प्रत्‍यक्षाला प्रमाणाची आवश्‍यकता नसते, अशी अवस्‍था निर्माण होते. याच सनातन हिंदुद्वेषातून सनातन हिंदु धर्माला कर्मकांडापर्यंतच मर्यादित केले. खरा सनातन हिंदु धर्म जगापुढे येऊच दिला नाही. जाणीवपूर्वक या गोष्‍टी घडवण्‍यात आल्‍या. मनुष्‍य जीवनात घडणार्‍या पालटांना १६ संस्‍कारांमध्‍ये वैज्ञानिकरित्‍या मांडून त्‍यांचे उत्‍सवात परिवर्तन करणारा हाच सनातन हिंदु धर्म आहे, तर ऋतूनुसार होणारे वातावरणातील पालट ओळखून त्‍या अनुषंगाने आहार-विहारातील पालट विविध सण आणि व्रते यांच्‍या माध्‍यमाने जनमानसात प्रेरित करणारा हाच तो सनातन हिंदु धर्म आहे. अशा असंख्‍य गोष्‍टी आहेत, ज्‍या याच सनातन हिंदु धर्माने समाजाला दिल्‍या आहेत. त्‍यामुळे समाजाचे जीवन सुखकारक आणि निरोगी झाले आहे. आज संपूर्ण जग हे भारताकडे अत्‍यंत आश्‍वासक दृष्‍टीने पहात आहे. हाच सनातन हिंदु धर्म जगाला दिशा दाखवत आहे; परंतु काही स्‍वार्थी लोक आपल्‍या स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी या सनातन हिंदु धर्माला संपवण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

या सनातन हिंदु धर्माला संपुष्‍टात आणणे कधीच शक्‍य नसले, तरीही अशा स्‍वार्थापोटी, राजकीय लोभापोटी सनातन हिंदु धर्मावर प्रहार करणार्‍यांना सडेतोड उत्तर देणे, ही काळाची आवश्‍यकता आहे आणि त्‍यासाठी सर्व हिंदु बांधवांनी एकत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे. दुसर्‍यावर अन्‍याय करणे, हेच चुकीचे आहे; परंतु आपल्‍यावर अन्‍याय होत असतांना त्‍याचा प्रतिरोध न करणे, हे त्‍यापेक्षाही अधिक चुकीचे आहे. याच सनातन हिंदु धर्मातून जन्‍मास आलेल्‍या बौद्ध आणि जैन धर्मांना सनातन हिंदु धर्मापासून वेगळे करण्‍याचा डाव आजपर्यंत हे कपटी सनातनविरोधी साधत आले आहेत. ‘फोडा आणि राज्‍य करा’ हीच नीती ते आजतागायत अवलंबत आलेले आहेत. त्‍यामुळे सर्वांनी एकत्र येऊया आणि धर्म काय आहे ? इतरांनाही समजावून सांगून सनातन हिंदु धर्मद्रोही लोकांना सडेतोड उत्तर देऊया !’

– डॉ. कुलदीप दिलीप शिरपूरकर, लेखक आणि आरोग्‍य सल्लागार, नाशिक (१७.९.२०२३)

(साभार : ‘सोशल रिव्‍हॉल्‍यूशन’ या ब्‍लॉगवरून)