३० सप्टेंबरला आष्टी हुतात्मा ते कौंडण्यपूरपर्यंत पदयात्रा !
नागपूर – विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवू औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ मिळवण्यासाठी ‘करू किंवा मरू किंवा कारागृहात सडू’, अशी घोषणा केली आहे. वेगळा विदर्भ मिळवण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी विदर्भवाद्यांकडून ‘नागपूर करारा’ची होळी करण्यात येणार असून ३० सप्टेंबर या दिवशी आष्टी हुतात्मा ते कौंडण्यपूरपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी येथे दिली.
महिलांचा सक्रीय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, तसेच राज्यघटनेतील कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला स्वतंत्र विदर्भ राज्याची ११८ वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणार्या नागपूर कराराची होळी जिल्ह्याजिल्ह्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहरात व्हेरायटी चौक येथे होळी केली जाणार आहे.