ठाणे येथील पनीर उत्पादकांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई !

४ लाख १ सहस्र ३७४ रुपये किंमतीचे साहित्य जप्त

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील दूध भेसळ थांबवण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील मे. केवला डेअरी अन् मे. यादव मिल्क प्रोडक्ट या ठिकाणी अचानक पडताळणी केली. त्या वेळी अस्वच्छ वातावरणात पनीर उत्पादन करत असल्याचे आढळून आले. (अस्वच्छ वातावरणात पनीरचे उत्पादन करून लोकांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक) या कारवाईत सुमारे ४ लाख १ सहस्र ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पनीरचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील अन्वेषण चालू आहे.