‘भारत’ नावाचे भान !

भारताचे नाव आणि समाज दोन्‍ही ‘भारत’ (म्‍हणजे साधनेत मग्‍न) असे व्‍हायला हवे !

संसदेच्‍या विशेष अधिवेशनात भारताचे ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ करण्‍याचा प्रस्‍ताव मांडण्‍यात येणार असल्‍याची जोरदार चर्चा आहे. त्‍याचा आरंभ राष्‍ट्रपतींच्‍या ‘लेटरहेड’पासून (अधिकृत पत्रापासून) झालाही आहे. त्‍यामुळे आता पुन्‍हा एकदा भाजपविरोधकांमध्‍ये वातावरण ढवळून निघाले आहे. नुकत्‍याच ‘आय.एन्.डी.आय.ए.’, म्‍हणजे इंडिया (म्‍हणजेच Indian National Democratic Inclusive Alliance)च्‍या विरोधकांनी भाजपविरोधी उभारलेल्‍या आघाडीला एकप्रकारे विरोध करण्‍यासाठी का होईना, सर्वांना ‘भारत’ या मूळ नावाचा वापर करावासा वाटू लागणे, ही चांगली गोष्‍ट आहे. मोदी शासनाने अनेक शहरे, स्‍थानके, मार्ग यांच्‍या नावात पालट करून परकीय आक्रमकांच्‍या खुणा पुसण्‍याचे जे धोरण चालू केले आहे, त्‍याचा पुढचा टप्‍पा म्‍हणून ते ‘भारत’ नावाचा उद़्‍घोष करू शकतात. काळानुसार भारत त्‍याच्‍या मूळ प्रवृत्तींकडे जात आहे, त्‍याचाच हाही एक भाग आहे. निमित्त ठरले आहे ‘जी २०’ परिषदेचे ! राष्‍ट्रपतींनी ‘जी २०’च्‍या सदस्‍य राष्‍ट्रांना सहभोजनाच्‍या पाठवलेल्‍या निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ म्‍हणून उल्लेख केल्‍याने ‘इंडिया’ आघाडीच्‍या सदस्‍य पक्षांकडून आता जोरदार टीकाटिपणी होत आहे; आताच हा पालट व्‍हावा, याविषयी त्‍यांच्‍याकडून रोष व्‍यक्‍त केला जात आहे. मुळात काँग्रेस आणि तिचे नेते हे भारताला एकसंघ देश न मानता ‘राज्‍यांचा संघ’ मानतात अन् ‘पूर्वीही तो तसाच राज्‍यांचा खंडप्राय प्रदेश होता’, अशा आशयाचेे मत राहुल गांधी यांनी नुकतेच व्‍यक्‍त केले होतेे. त्‍यामुळे त्‍यांना ‘अखंड भारतवर्षा’चे महत्त्व काय कळणार ? असो. या निमित्ताने का होईना. हा पालट होत आहे, यासाठी देशप्रेमी जनतेला समाधान वाटत आहे.

प्रत्‍येक व्‍यक्‍ती किंवा देश जगातील कुठल्‍याही भाषेमध्‍ये त्‍याच्‍या त्‍याच्‍या नावानेच ओळखला जातो; कारण ते त्‍याचे ‘नाव’ असते; मात्र देशाला इंग्रजी भाषेत वेगळे नाव असणारा आपला एकमेव देश जगात असेल. ‘इंडस व्‍हॅली’वरून इंग्रजांनी भारताला ‘इंडिया’ केले. स्‍वातंत्र्यानंतर आपली पाळेमुळे परत या भूमीत रुजवण्‍याची सुवर्णसंधी होती; परंतु संपूर्णपणे इंग्रजाळलेल्‍या आणि अन्‍य पंथामध्‍ये जन्‍म घेतलेल्‍या भारताच्‍या पहिल्‍या पंतप्रधानांनी जाणूनबुजून भारतियांची स्‍वभूमीशी असलेली नाळ तोडून टाकण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याचाच एक भाग म्‍हणजे भारत विदेशाप्रमाणे स्‍वदेशातही ‘इंडिया’ म्‍हणून ओळखला जाऊ लागला.

भारतवर्षाचा इतिहास !

ऋग्‍वेदाच्‍या एका ऋचेमध्‍ये ‘दशराजन युद्धा’चे, म्‍हणजे दहा राजांच्‍या युद्धाचे वर्णन आहे. पंजाब प्रांतातील रावी नदीच्‍या तिरावर भरत जमातीचा राजा सुदास याने १० राजांना हरवून हे युद्ध जिंकले. पुढे अनेक वर्षे राजा सुदासचे नाव जगभर होते आणि त्‍याची भूमी ती भारतवर्ष किंवा भारतभूमी म्‍हणून ओळखली जाऊ लागली. विष्‍णुपुराणानुसार ‘समुद्राच्‍या उत्तरेला आणि बर्फाळ डोंगरांच्‍या दक्षिणेला असलेला देश हा ‘भारतम्’ आहे.’ कौरव-पांडव यांच्‍या आधीच्‍या वंशपरंपरेत दुष्‍यंत आणि शकुंतला यांचा अत्‍यंत शूरवीर पुत्र राजा भरत हा चक्रवर्ती सम्राट झाला होता. त्‍याच्‍या नावावरूनच हा प्रदेश ‘भारतवर्ष’ म्‍हणून ओळखला जात होता.

जेव्‍हा आपण ‘भारतवर्ष’ म्‍हणून उल्लेख करतो, तेव्‍हा अर्थातच अखंड भारताचे चित्र डोळ्‍यांसमोर उभे रहाते; कारण जिथे ‘शब्‍द’ उच्‍चारला जातो, तेव्‍हा त्‍याचे एक विशिष्‍ट रूपही त्‍यासमवेत साकार होत असते. अफगाणिस्‍तानपासून नेपाळपर्यंत आणि इराण, चीनपासून बांगलादेश, श्रीलंकेपर्यंत, इतकेच काय तर रशिया आणि अन्‍य काही सध्‍याचे इस्‍लामी देशही भारतातच होते. भारतातील प्राचीन राजे हे अश्‍वमेध यज्ञ करत; म्‍हणजेच संपूर्ण पृथ्‍वीवरील राजांना जिंकून एकप्रकारे संपूर्ण पृथ्‍वीवर राज्‍य करत. ‘भारत’ नावाला असा व्‍यापक इतिहास असल्‍याने ‘भारत’ या नावाचे स्‍मरण भारताच्‍या या सर्वव्‍यापी आणि समृद्ध परंपरेची आठवण सतत मनात जागृत ठेवण्‍यास कारणीभूत ठरू शकते. सध्‍याच्‍या काळात भारत जी आर्थिक गती पकडत आहे, त्‍या अनुषंगाने आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर विश्‍वगुरु होण्‍याचे जे स्‍वप्‍न उराशी बाळगून आहे, त्‍या पार्श्‍वभूमीवर भारताची ‘भारत’ हीच ओळख विश्‍वभर रहाणे सर्वार्थाने योग्‍य ठरेल.

दायित्‍व वाढेल !

जेव्‍हा आपण सार्वत्रिक स्‍तरावर भारताचा ‘भारत’ म्‍हणून उल्लेख करू, तेव्‍हा भारतातील राज्‍यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आणि जनता या सर्वांचेच दायित्‍व किती अधिक पटींनी वाढेल, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यायला हवे. ‘भा’ म्‍हणजे तेज आणि ‘रत’ म्‍हणजे मग्‍न असलेला, म्‍हणजे तेजाच्‍या उपासनेत मग्‍न असलेला (साधना करणारा) तो ‘भारत’ ! असा त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावरील अर्थ आहे. रामराज्‍याची आदर्श प्रजा ही साधनारत होती. पंतप्रधान मोदी वारंवार ‘वसुधैव कुटुंम्‍बकम्’ ही आपली संस्‍कृती असल्‍याची जाणीव करून देतात आणि विविध उदाहरणांतून अन् त्‍यांच्‍या धोरणांतून ते पटवूनही देतात. तशी क्षमता खर्‍या अर्थाने भारतामध्‍ये निर्माण होण्‍यासाठी ‘साधनारत राजा आणि प्रजा’ निर्माण होणे अपेक्षित आहे.

काँग्रेस आणि अन्‍य भाजपविरोधी नेते यांचा विरोधासाठी विरोध अन् टीकाटिपणी चालू झाली आहे आणि ती चालू राहील; पण ‘भारताला ‘भारत’ म्‍हणण्‍याचा आग्रह धरतांना सतत आदर्शाचा आग्रह धरावा लागेल’, याची जाणीव ठेवावी लागेल. भारताला एक आदर्श राज्‍यव्‍यवस्‍थेची प्राचीन परंपरा आहे. ‘शत्रूचा समूळ बीमोड करणारा’, असे त्‍याचे प्रथम व्‍यवच्‍छेदक लक्षण आहे. ‘तत्‍पर आणि योग्‍य न्‍यायव्‍यवस्‍था’, ‘अत्‍युच्‍च आणि सर्वव्‍यापी शिक्षणव्‍यवस्‍था’, ‘आदर्श राज्‍यव्‍यवस्‍था’, ‘स्‍त्रियांसाठी संपूर्ण सुरक्षितता’, अशी काही या ‘भारता’ची लक्षणे आहेत. ‘भारत’ म्‍हणतांना ही सारी लक्षणेही त्‍यात अंतर्भूत होण्‍यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील. असे झाले, तर भारतीय समाजव्‍यवस्‍थेचे ते एक पुनर्निर्माण आणि पुनरुज्‍जीवन असेल अन् त्‍याच वेळी ‘भारत’ हे नाव खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल आणि शोभून दिसेल  !