आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवण्‍यासाठी अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही ! – अक्षय महाराज भोसले

अक्षय महाराज भोसले

छत्रपती संभाजीनगर – चांगला समाज, आदर्शवत् राज्‍य आणि देश घडवायचा असेल, तर अध्‍यात्‍माविना तरणोपाय नाही. याचे भान ठेवून आतापर्यंत राजकारणापासून अलिप्‍त असलेल्‍या संत घराण्‍यातील वंशजांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. आगामी काळात आध्‍यात्मिक राजकारणातून परिवर्तन घडवण्‍यात येणार आहे, अशी घोषणा ‘धर्मवीर आध्‍यात्मिक सेने’चे प्रदेशाध्‍यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले यांनी येथील सभेत केली.

शिवसेनेची ‘धर्मवीर आध्‍यात्मिक सेना’ स्‍थापन झाली आहे. त्‍यांच्‍या वतीने नुकतीच सावित्री लॉन्‍स सभागृहात पहिल्‍या हिंदु धर्म सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्‍वलनाने झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पालकमंत्री संदीपान भुमरे, राज्‍य कार्यकारणी सदस्‍य प्रभंजन महातोले, श्री. पुष्‍कर महाराज गोसावी आदी उपस्‍थित होते. प्रास्‍ताविक जिल्‍हाध्‍यक्ष श्री. कडुबाळ महाराज गव्‍हादे यांनी केले.

श्री. अक्षय महाराज म्‍हणाले की,

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्‍या सर्वांना जुलमी राजवटीतून बाहेर काढले. स्‍वराज्‍याची सर्वांना जाणीव करून दिली, तसेच संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्‍वामी आदींनी अनिष्‍ठ परंपरा, चालीरिती, जुलूम, अन्‍याय, अत्‍याचार यांच्‍या विरोधात आवाज उठवला. अनमोल संत साहित्‍य दिले.

२. राजा आणि राज्‍य कसे असावे ? यासाठी संतांची अध्‍यात्‍मिक भूमिका अत्‍यंत महत्त्वाची राहिली आहे; मात्र काळाच्‍या ओघात राजकारणापासून अध्‍यात्‍मिक साधू, संत, वारकरी आणि महाराज दूर गेले होते.

३. त्‍यामुळे राजकारणाची वाताहत झाली आहे. अध्‍यात्‍माविना राजसत्तेवर चांगले लोक येणार नाहीत. याचे भान ठेवून आगामी काळात सर्व वारकर्‍यांनी एकाच छताखाली येणे आवश्‍यक आहे.

४. त्‍याचा प्रारंभ धर्मवीर अध्‍यात्‍मिक सेनेच्‍या माध्‍यमातून झाला आहे, तसेच संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्‍वामी आदी संत घराण्‍यातील वंशजांनी धर्मवीर अध्‍यात्‍मिक सेनेत प्रवेश केला असून आगामी काळात त्‍याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.