वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गावात कायमस्वरूपी वायरमन देण्याची मागणी
सावंतवाडी – वीजदेयक वसुली करण्यात आणि वीजदेयक थकीत राहिल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात तत्परता दाखवणारे वीज वितरण आस्थापन गावातील विजेच्या समस्या सोडवण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ४ ऑगस्ट या दिवशी तालुक्यातील माडखोलवासियांनी वीज वितरण आस्थापनाच्या येथील कार्यालयाबाहेर ढोल वाजवत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ‘तिरडी’ आंदोलन केले.
माडखोल गाव विस्ताराने मोठा असून तेथे वारंवार विजेच्या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. ६ मासांपूर्वी गावात कायमस्वरूपी असलेल्या वायरमनचे (तारतंत्रज्ञाचे) अन्यत्र स्थानांतर झाले. तेव्हापासून माडखोलमध्ये २ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. याविषयी सातत्याने मागणी करूनही त्याची पूर्तता केली जात नाही, असा आरोप ग्रामस्थांनी आंदोलनाच्या वेळी केला. विविध राजकीय पक्षांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी या वेळी केली.
ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर, ‘माडखोल गावातील समस्यांविषयी कार्यकारी अभियंत्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नवीन नियमित कर्मचारी मिळेपर्यंत संतोष डोईफोडे यांची नियुक्त करण्यात आलेली आहे’, असे पत्र उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांना दिले. यानंतर माडखोलवासियांनी आंदोलन मागे घेतले.
संपादकीय भूमिकाप्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ? |