अपघातांना अटकाव ?

समृद्धी महामार्गावरील बुलढाण्‍याजवळच अधिकाधिक अपघात का होतात ? याविषयी तथाकथित बुद्धीप्रामाण्‍यवादी बोलतील का ?

समृद्धी महामार्गावर सातत्‍याने अपघातांच्‍या घटना घडत असून हा महामार्ग चालू झाल्‍यापासून आतापर्यंत ९५० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. बुलढाणा जिल्‍ह्याच्‍या सिंदखेडराजा तालुक्‍यातील पिंपळखुटा गावाजवळ याच मासात समृद्धी महामार्गावर खासगी बसला झालेल्‍या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला होता. यानंतर या मार्गावरील अपघात टाळण्‍यासाठी शासनस्‍तरावर विविध उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. बुलढाणा परिसरातच अनेक अपघात झाले आहेत, त्‍यामुळे या ठिकाणी दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्‍वामी समर्थ  संप्रदायाच्‍या वतीने ‘बस अपघातात मृत्‍यू झालेल्‍या २५ जणांच्‍या आत्‍म्‍यास शांती मिळण्‍यासाठी आणि भविष्‍यात या महामार्गावर अपघात होऊ नये’; म्‍हणून प्रवाशांच्‍या सुरक्षिततेसाठी १५० महिला आणि पुरुष यांनी मिळून महामृत्‍युंजय यंत्राची स्‍थापना केली अन् सव्‍वा कोटी महामृत्‍युंजय मंत्राचा जपही करण्‍यात आला; मात्र याच्‍या विरोधात महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘जादूटोणाविरोधी कायद्या’च्‍या आधारे पोलीसांत तक्रार केली आणि या तक्रारीनुसार बुलढाणा पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे.

हिंदु आणि हिंदुद्वेषाची कावीळ झालेली अंनिस आतापर्यंत हिंदु धर्मातील गोष्‍टींना कायमस्‍वरूपी विरोध करत आहे. जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदु धर्माच्‍या विरोधातच आहे. जर हा कायदा केवळ फसवणूक, आर्थिक लुबाडणूक वा अत्‍याचारांच्‍या विरोधात आहे, तर ‘समृद्धी महामार्गावरील अपघात रोखावेत’, ‘लोकांचा जीव वाचावा’, या शुद्ध हेतूने स्‍वत:च्‍या व्‍ययाने कुणी प्रार्थना, पूजा, मंत्रजप आदी करत असेल, तर त्‍यात चुकीचे काय ? यात कोणता गुन्‍हा आहे ? यातून कायदा-सुव्‍यवस्‍थेला बाधा कुठे निर्माण झाली ? याचे उत्तर ना अंनिसवाल्‍यांकडे ना पोलीस प्रशासनाकडे !

…यात चुकीचे ते काय ?

मनुष्‍याच्‍या जीवनात उद़्‍भवणार्‍या ८० टक्‍के समस्‍यांमागे प्रारब्‍ध, अतृप्‍त पूर्वजांच्‍या लिंगदेहांचे आणि अनिष्‍ट शक्‍तींचे त्रास इत्‍यादी आध्‍यात्‍मिक कारणे असतात. सध्‍याच्‍या कलियुगात बहुतांशी समाज धर्माचरणापासून विन्‍मुख झाला आहे. त्‍यामुळे समाज आणि वातावरण यांतील रज-तम या त्रासदायक गुणांचे प्राबल्‍य वाढले आहे. हे अनिष्‍ट शक्‍तींना पोषक असल्‍याने त्‍यांचे प्राबल्‍य वाढले आहे आणि त्‍यामुळे त्‍यांचे मानवाला त्रास देण्‍याचे प्रमाणही पुष्‍कळ वाढले आहे. प्रारब्‍धामुळे एखाद्याचा मृत्‍यू असेल, तर तो कुणीही टाळू शकत नाही; मात्र अनिष्‍ट शक्‍तींचे होणारे त्रास आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय आणि संतांनी सांगितलेल्‍या धार्मिक कृती केल्‍यानंतर निश्‍चितच टाळू शकतो. त्‍या अनुषंगाने समृद्धी मार्गावरील बुलढाण्‍याजवळच अधिकाधिक अपघात होत असतील, तर तेथे आध्‍यात्मिक त्रासाचे प्राबल्‍य नाकारता येत नाही. त्‍यामुळे आध्‍यात्मिक त्रास होऊ नये; म्‍हणून महामृत्‍युंजय यंत्राची स्‍थापना करून त्‍याचा नामजप करण्‍यात आला, तर यात चुकीचे ते काय ? मात्र जे अंनिसवाले, बुद्धीप्रामाण्‍यवादी, नास्‍तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना ते पटत नाही, त्‍याला आम्‍ही काय करावे ?

भारतीय अवकाश संशोधन संस्‍थेच्‍या (‘इस्रो’च्‍या) शास्‍त्रज्ञांनी सिद्ध केलेले ‘चंद्रयान ३’ श्रीहरिकोटा येथील तळावरून अवकाशात यशस्‍वीपणे झेपावले आणि ते चंद्रावर उतरण्‍याची शक्‍यता आहे. हे चंद्रयान अवकाशात झेपावण्‍यापूर्वी शास्‍त्रज्ञांनी तिरुपति येथे जाऊन बालाजीच्‍या चरणी चंद्रयानाची प्रतिकृती ठेवून त्‍याचे आशीर्वाद घेतले. ‘चंद्रयान ३’ यशस्‍वीपणे अवकाशात झेपावलेही ! याचाच अर्थ बालाजीचे म्‍हणजे ईश्‍वराचे संरक्षण कवच चंद्रयानाच्‍या भोवती असल्‍याने ते यशस्‍वीपणे कार्यरत झाले; मात्र सध्‍याच्‍या विज्ञानयुगात हे कुणी मान्‍य करत नाही; उलट टीका करून अकलेचे तारे तोडतात.

याविषयी अंनिसवाले बोलणार का ?

अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने नुकताच एक धक्‍कादायक खुलासा केला आहे. नर्गिस ही अमेरिकेतून मुंबईत आल्‍यानंतर ती हिल रोडवरील एका इमारतीत रहात होती. त्‍या घरात रहात असतांना तिला ४ दिवस भयंकर स्‍वप्‍ने पडत होती. रात्री ३ वाजता तिला अचानक जाग येत होती. स्‍वप्‍नात तिला भूतासारखी एक व्‍यक्‍ती दिसत होती आणि ती व्‍यक्‍ती तिला स्‍मशानभूमीत नेत होती. त्‍यानंतर ती व्‍यक्‍ती तेथे खोदकाम करून मेलेल्‍या माणसांची हाडे आणि मांस बाहेर काढून खात असे. नंतर नर्गिस फाखरी हिला समजले की, तिच्‍या घराशेजारीच स्‍मशानभूमी आहे. त्‍यामुळे तिला हे त्रास होत आहेत. त्‍यानंतर तिने ते घर सोडण्‍याचा निर्णय घेतला. यावरून समाजात अनिष्‍ट शक्‍तींचे अस्‍तित्‍व आहे, हे स्‍पष्‍ट होते.

काळा कायदा रहित करा !

खरेतर हिंदु धर्मानुसार होमहवन, यज्ञ असे विधी केल्‍यानंतर समाजातील रज-तम गुण नष्‍ट होऊन सात्त्विकता वाढते. यासाठी पूर्वीच्‍या काळी यज्ञविधी मोठ्या प्रमाणात केले जात होते. हिंदु धर्मातील धार्मिक कृतींना अंधश्रद्धा म्‍हणून झिडकारणे, त्‍याच्‍या विरोधात समाजात चुकीचा अपप्रचार करून लोकांच्‍या मनात धर्माविषयी नकारात्‍मकता निर्माण करणे, हे अंनिसचे कार्य घातक आहे. उद्या जर कुणी विश्‍वकल्‍याणार्थ यज्ञयाग केला, तर त्‍यांच्‍यावरही गुन्‍हा नोंदवण्‍याची मागणी ‘अंनिस’वाले करतील आणि असे गुन्‍हे नोंदवून धार्मिक कृत्‍यांवर गंडांतर आणले जाईल; मात्र हेच अंनिसवाले ख्रिस्‍ती अन् इस्‍लाम पंथांतील धार्मिक गोष्‍टींच्‍या विरोधात मूग गिळून गप्‍प बसतात. एड्‍स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्‍य रोग बरे करण्‍याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्‍या ख्रिस्‍ती मिशनर्‍यांच्‍या कार्यक्रमावर गुन्‍हा नोंद करण्‍यासाठी अंनिसवाले कधीही पुढाकार घेत नाहीत, तसेच अंनिसवाल्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या वेगवेगळ्‍या आंदोलनातून त्‍यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो. त्‍यामुळे समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा’ रहित करण्‍यासाठी वैध मार्गाने लढा दिला पाहिजे, तसेच सरकारनेही हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणारा हा काळा कायदा रहित करावा, ही धर्मप्रेमींची अपेक्षा !