भोर (पुणे) येथील धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात असलेले पांडवकालीन कांबरेश्‍वर मंदिर पाण्‍याबाहेर !

धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील पाणी आटल्‍याने दिसणारे पांडवकालीन कांबरेश्‍वर मंदिर

भोर (जिल्‍हा पुणे), १५ जून (वार्ता.) – येथील भोर तालुक्‍यामध्‍ये वेळवंड गावातील वेळवंडी नदीवर भाटघर नावाचे धरण आहे. या धरणातील पाणी आटलेले आहे. सध्‍याच्‍या परिस्‍थितीत या धरणात केवळ ६ टक्‍के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मंदिराच्‍या परिसरातील पाणी पूर्ण आटले आहे. त्‍यामुळे या धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात असलेले कांबरे गावातील पांडवकालीन कांबरेश्‍वर मंदिर पाण्‍याबाहेर आले आहे. या मंदिरात स्‍वयंभू शिवलिंग, पार्वतीमातेची मूर्ती आणि २ नंदी आहेत. पाण्‍याखाली गेलेले हे एक प्राचीन मंदिर मानले जात आहे. हे मंदिर पहाण्‍यासाठी भक्‍तजन, तसेच संशोधक यांची भली मोठी रांग लागलेली आहे. अनेकजण या मंदिराचा इतिहास आणि पार्श्‍वभूमी जाणून घेण्‍याचा प्रयत्नही करत आहेत.

स्‍थानिकांच्‍या प्रतिक्रिया

त्‍या ठिकाणच्‍या स्‍थानिकांनी सांगितले की,

१. मंदिरावर देवी पार्वतीच्‍या कोरीव प्रतिमा आहेत. मंदिराच्‍या भिंती दगडाच्‍या आहेत. गाभार्‍याच्‍या वरचा भाग विटा आणि चुना यांनी बांधलेला आहे. याविषयी एक आख्‍यायिका सांगितली जाते की, एक शेतकरी नांगरणीसाठी त्‍याठिकाणी गेला असतांना भूमी नांगरतांना तिथे रक्‍त आल्‍याचे दिसले. त्‍यानंतर दुसर्‍या दिवशी त्‍या ठिकाणी त्‍याला स्‍वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले, ही घटना गावकर्‍यांना सांगताच गावातील लोकांनी नंतर त्‍या ठिकाणी मंदिर बांधले.

२. काहींच्‍या मते हे मंदिर शिवकालीन आहे. त्‍याचा संदर्भ असा की, वेळवंड हे गाव राजगडाच्‍या समीप आहे. राजगडावरही वाडेश्‍वराचे मंदिर आहे. या गावातील प्रत्‍येकाचे ग्रामदैवत वाडेश्‍वर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीही अनेक ठिकाणी जी मंदिरे बांधली ती शिवाचीच होती असाही संदर्भ दिला जातो. वेळवंडी नदीच्‍या बाजूलाच वेळवंड गाव आहे. त्‍या ठिकाणी नागेश्‍वराचे मंदिर आहे, तेही वाडेश्‍वराचे रूप आहे, असे सांगितले जाते.

३. परंतु काहींच्‍या मते ते मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. त्‍यामुळे ते पांडवकालीन आहे. १० मास हे मंदिर पाण्‍याखाली असते, तर फक्‍त २ मास हे मंदिर पाण्‍याच्‍या बाहेर असते. या परिसरात अनेक वीरगळही आहेत. या सर्व स्‍मृतींचे तज्ञांकडून विश्‍लेषण करून हा वारसा जपायला हवा, अशी लोकभावना आहे.