पणजी – गोवा पोलिसांनी गेल्या ४ मासांत तब्बल ७३ अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे, तसेच नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस्) कायद्यांतर्गत ६० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते एप्रिल या कालावधीत टाकलेल्या धाडींमध्ये विविध प्रकारचे ६७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. धाडी टाकण्यात आलेले आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले बहुतांश भाग हे किनारी भागातील होते.
67kg drugs seized in Goa from Jan to April https://t.co/tITI8j4eGf
— Goemkarponn (@goemkarponnlive) May 27, 2023
आम्ही प्रकरणांचा मागोवा घेत आहोत आणि मुख्य अमली पदार्थ तस्करांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. बहुतेक वेळा त्यात विदेशी नागरिक आणि भारतातील इतर राज्यांतील लोकांचा सहभाग असतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. अधिकृत नोंदींनुसार, वर्ष २०१७ मध्ये १६८ प्रकरणे, वर्ष २०१८ मध्ये २२२ प्रकरणे, वर्ष २०१९ मध्ये २१९ प्रकरणे, वर्ष २०२० मध्ये १४८ प्रकरणे, वर्ष २०२१ मध्ये १२१ प्रकरणे आणि वर्ष २०२२ मध्ये १५४ प्रकरणे अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत नोंदवण्यात आली आहेत.
भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांना मेथॅम्फेटामाइन मिश्रित पाणी पिण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणामुळे मेथॅम्फेटामाइन हा अमली पदार्थ राज्यात सहज उपलब्ध होत आहे, असे आढळले. अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरणाचा अवलंब केल्याचा आणि अमली पदार्थ उपलब्ध होऊ शकत असलेल्या परिसरात बार, रेस्टॉरंट्स आणि शॅकमध्ये अचानक तपासणी केल्याचा दावा सरकार करत असले, तरी राज्यात अमली पदार्थांशी संबंधित मृत्यू आणि व्यवहार चालूच आहेत.