जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, अशी भूमिका ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या स्थापनेच्या वेळी निश्चित करण्यात आली. याच समवेत मंदिरांची सुरक्षा, समन्वय, संघटन, संपर्क यंत्रणा आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र होणे यांसाठी कार्य करण्याचा संकल्प अशी पंचसूत्री त्यात ठरवण्यात आली. विविध कृतीच्या सूत्रांसमवेत या बैठकीत प्रामुख्याने सर्व मंदिर सदस्यांची प्रत्येक मासाला ‘ऑनलाईन’ बैठक, प्रति ३ मासांत प्रत्यक्ष बैठक आणि वर्षातून एकदा ‘मंदिर न्यास परिषद’ घेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीनंतरचे विविध कार्य पुढीलप्रमाणे…
संकलक : श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती.
१. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची पहिली राज्यस्तरीय बैठक पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानात पार पडली. या बैठकीला राज्यातील ५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, मंदिरांच्या संदर्भात कार्य करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मंदिरांवरील आघातांच्या संदर्भात संघटितपणे लढण्याचा सर्व विश्वस्त आणि प्रतिनिधी यांनी निर्धार केला.
२. आसाम सरकारने १४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी एक विज्ञापन प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाने भूमिका घेत ‘स्वत: आद्य शंकराचार्य यांचे बारा ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलिलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच भगवान शिवाचे सहावे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्वय ंस्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको’, अशी भूमिका घेत त्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले.
३. मार्च मासात मुंबई येथे विधानसभेचे अधिवेशन चालू असतांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. ज्या मंदिरांवर प्रशासक अथवा न्यायाधीश यांची नेमणूक झालेली आहे, ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदूंच्या नियंत्रणात देण्यात यावी, या संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक बोलावण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.
४. ‘श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण कृती समिती’ने तुळजापूर येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. (३.५.२०२३)
अन्य घडामोडी, तसेच सदस्यांनी केलेले प्रयत्न !१. बैठकीनंतर कृतीप्रवण होत रायगड जिल्ह्यातील उपाध्याय संघाने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी पुढाकार घेतला, तसेच अंमळनेर येथील मंदिरांनी समाजोपयोगी उपक्रम चालू केले. २. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची रात्री बंद होण्याची वेळ निश्चित नव्हती. या संदर्भात पंढरपूर येथील सदस्य श्री. गणेश लंके यांनी पुढाकार घेऊन निवेदन दिल्यावर मंदिर आता रात्री १०.३० वाजता बंद होते. ३. मंदिर सदस्यांच्या ठिकठिकाणी विभागीय बैठका झाल्या. यात विभागीय स्तरावरील मंदिरांचे प्रश्न आणि त्या संदर्भात कृतीची दिशा ठरवण्यात आली. |