नवी मुंबई – जलवाहिनी दुरुस्तीनंतर ४२ घंट्यांनी तुर्भेसह शहरातील अन्य भागांत पुष्कळ गढूळ पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यावाचून जनतेचे हाल झाले. या विषयी तुर्भे येथील माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. त्यामुळे तुर्भेकरांना मोठा दिलासा मिळाला.
नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरता स्थलांतरित करणे, कळंबोली येथे द्रुतगती महामार्गच्या पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकणे, तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची आणि इतर कामे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली.
या कामासाठी १० एप्रिल या दिवशी सकाळी १० ते ११ एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ घंट्यासाठी बंद करण्याचे नियोजन होते. ११ एप्रिलला संध्याकाळी पाणीपुरवठा टप्याटप्याने अल्प दाबाने चालू होणार होता; मात्र दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने २४ घंट्याचा ‘शटडाऊन’ ४२ घंट्यावर गेला. ११ एप्रिलला संध्याकाळी पाणी न आल्याने नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आणि लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या जार विक्रीची दुकाने गाठली. पिण्याच्या पाण्याचे २० लिटरचे जार विकत घेतले.
अनेक जणानी बिसलेरी पाण्याचे बॉक्स मिळेल त्या भावाने विकत घेतले. १२ एप्रिल या दिवशी पहाटे ४ वाजता तुर्भे परिसरात पाणी आले; मात्र ते पूर्णपणे गढूळ पाणी होते. थोडा वेळाने शुद्ध पाणी येईल या आशेने रहिवाशांनी पिण्याचे पाणी भरून ठेवले नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी बंद होण्याची वेळ होत आली असतांनाही असेच गढूळ पाणी येत राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. केवळ वापरासाठी पाणी भरून ठेवले; मात्र पिण्यासाठी पाणी नसल्याने पुन्हा सकाळी बिसलेरीसाठी दुकाने गाठावी लागली.
माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील आणि कविताताई पाटील यांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. त्यामुळे तुर्भेकरांना मोठा दिलासा मिळाल्याने तुर्भेकरांनी त्यांचे आभार मानले.
जलवाहिनी दुरुस्तीनंतर आलेले गढूळ पाणी उकळून आणि गाळून पिऊ शकता, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.