कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंदिर परिसरात फिरतांना भाविकांच्या पायाला चटके बसतात. तरी हे चटके टाळण्यासाठी मंदिर परिसरात भवानी मंडप, घाटी द्वार आणि विद्यापीठ गेट परिसरांत फरशीवर ‘कूल कोट’ देण्यात येणार आहे. याची चाचणी घेण्यात आली असून श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी लवकरच ‘कूल कोट’ देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.
हा ‘कोट’ फरशीवर दिल्याने उन्हाची तीव्रता कित्येक पटीने अल्प होते आणि त्यामुळे भाविकांना मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालण्यास कोणताही त्रास होणार नाही. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात असणार्या भाविकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काही खासगी संस्थांकडून पाण्याची यंत्रे बसवण्यात येत आहेत, याच समवेत जे भाविक श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात त्यांनाही पाणी मिळण्यासाठी काय व्यवस्था करता येईल ? यावर आमचा विचार चालू आहे, असे महादेव दिंडे यांनी सांगितले.