तुमसर (जिल्हा भंडारा) येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील ७ दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा !

भंडारा – वर्ष २०१४ मधील  बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा ११ एप्रिल या दिवशी अंतिम निकाल लागला. तुमसर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तुमसर शहरातील रामकृष्णनगर येथे रहाणारे संजय सोनी (वय ४७ वर्षे), पूनम सोनी (वय ४३ वर्षे), ध्रुमिल सोनी (वय ११ वर्षे) या एकाच कुटुंबातील तिघांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या त्यांचा चालक आणि त्यांचे ६ सहकारी यांनी केली होती, तसेच ५ कोटी रुपयांचे दागिने पळवले होते. येथील प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर्.जी. अस्मर यांनी निकाल घोषित करतांना ७ आरोपींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांड प्रकरणी ८०० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता.

संजय सोनी चालकाला घेऊन गोंदिया येथे गेले होते.  ते कामे आटोपून रात्री गावी तुमसर येथे परत निघाले. चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने गाडी थांबवली. चालकांचे ३ साथीदार थांबले होते. त्याने त्यांना ‘तुमसरपर्यंत जायचे आहे’, असे सांगून गाडीत बसवले. नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली. हत्येनंतर सोनी यांच्या निवासस्थानी जाऊन मुलगा आणि पत्नी यांचीही हत्या केली. तीन हत्या केल्यानंतर तिजोरीतील दागिने आणि नगदी घेऊन चालक आणि त्याचे सहकारी पसार झाले; मात्र जाण्यापूर्वी हे तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले अन् घरात दरोडा पडल्याचा देखावा केला होता.