छत्रपती संभाजीनगर येथील ‘मास कॉपी’प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा भोंगळ कारभार !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पदवी परीक्षेत चक्क ‘मास कॉपी’ चालू असल्याचा प्रकार समोर आला होता. सकाळी परीक्षेवेळी विद्यार्थी कोरी पाने सोडत असत. त्यानंतर पुन्हा सायंकाळी विद्यार्थ्यांना पेपर सविस्तर लिहिण्यासाठी दिला जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. आता याची गंभीर नोंद विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून ‘मास कॉपी’प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली असून ते २४ घंट्यांत चौकशी समिती अहवाल देणार आहेत.

जिल्ह्यातील शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी ‘मास कॉपी’ चालू असल्याचा आरोप करण्यात आला होता. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदार यांच्याकडून हे सर्व पेपर ऑपरेट केले जात होते. यामध्ये हे दुकानदार फक्त ३०० ते ५०० रुपये घेऊन विद्यार्थ्यांना मासकॉपी पुरवत आहेत, असा आरोप झाला आहे, तर एका विद्यार्थिनीने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. ज्यात ‘मास कॉपी’ करतांनाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या येताच विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर नोंद घेतली. या महाविद्यालयाची मान्यता रहित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा परीक्षा केंद्र हलवण्याची शक्यता आहे. त्या परीक्षा केंद्रावर झालेले सर्व पेपर पुन्हा घेण्याचाही विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.