|
नाशिक – चैत्रोत्सवानिमित्त येथील सप्तश्रृंग गडावर दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने प्रसादाची मागणी वाढली आहे. अनेकदा विक्रेत्यांकडून प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य भेसळ टाळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन धडक मोहिमेद्वारे अन्नपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी कह्यात घेत आहे. अधिकार्यांचे पथक तेथे ८ दिवस गडावर तळ ठोकून आहेत.
सप्तश्रृंग गडावरील हॉटेल, स्टॉल, प्रसाद विक्रेते यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना स्वच्छता परवाना नोंदणीविषयी सूचना दिल्या आहेत, तसेच विषबाधेसारख्या घटना होऊ नयेत, यासाठी घ्यावयाच्या दक्षतेविषयी मार्गदर्शन केले आहे. तरीही अनुचित घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गडावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ३० मार्च ते ६ एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावर बंदी रहाणार आहे. एस्.टी.मध्ये भाविकांसह प्रवासी वाहतूक चालू राहील. पायी दर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणांहून दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.