रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि नामजप करतांना साधिकेला फुले अन् अत्तर यांचा सुगंध येणे

कु. आरती सुतार

१. सेवा आणि नामजपादी उपाय करतांना फुलांचा सुगंध येणे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि नामजपादी उपाय करतांना अन् अन्य ठिकाणीही मला वेगवेगळ्या फुलांचा सुगंध येत असे. प्रत्येक वेळी मला १ किंवा २ प्रकारच्या फुलांचा सुगंध यायचा. ‘या वेळी सुगंध येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. सेवा करतांना मला मध्येच माती आणि अत्तर यांचा सुगंध येत होता.  मला अत्तराचा सुगंध अधिक प्रमाणात आला.

२. ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना अत्तराचा सुगंध येणे

२३ ते २५.१२.२०२२ या कालावधीत मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय करतांना ‘पूर्ण ध्यानमंदिर अत्तराच्या  सुगंधाने भरलेले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या चेहर्‍यावर जळजळ होत होती. त्यानंतर मला आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवत होती. यापूर्वी मला उदबत्तीच्या सुगंधाची अनुभूती आली होती. या वेळी मला सेवा आणि नामजपादी उपाय करतांना अत्तराचा सुगंध येण्याची अनुभूती २ – ३ वेळा आली.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार नामजपादी उपाय केल्यावर अत्तराचा सुगंध येणे, त्रास उणावणे आणि हलकेपणा  जाणवणे

एकदा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपायांचा आढावा द्यायला आणि पुढील नामजपादी उपाय विचारायला गेले होते. त्या  वेळी मी त्यांना मला येत असलेल्या अनुभूतींविषयी सांगितले आणि त्याविषयीच्या शंका विचारल्या. तेव्हा त्यांनी मला ‘स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण कसे काढायचे आणि नामजपादी उपाय कसे करायचे ?’, याविषयी सांगितले. मी त्याच दिवशी दिवसभर त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केले. ते केल्यावर रात्री मला अत्तराचा सुगंध येऊ लागला. हा सुगंध २ घंटे टिकून होता. अत्तराच्या सुगंधामुळे माझ्या चेहर्‍यावर होणारी जळजळही न्यून झाली होती. सद्गुरु गाडगीळकाकांनी शिकवल्याप्रमाणे आवरण काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा परिणाम लगेच झाला. मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.

‘या अनुभूतींच्या माध्यमातून मला गुरुतत्त्वाशी एकरूप होता येऊ दे आणि गुरूंना अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी गुरुचरणी भावपूर्ण  प्रार्थना !’

– कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (६.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक