‘५.८.२०२२ या दिवशी माझी आजी श्रीमती वनिता कांबळी (वय ८२ वर्षे) हिचे निधन झाले. त्या वेळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका सेवेसाठी गेले होते. मी तेथे असतांनाच मला आजीचे निधन झाल्याविषयी समजले. त्या वेळी माझ्या मनाची झालेली प्रक्रिया आणि गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) अनुभवलेली कृपा येथे दिली आहे.
१. आजीला अर्धांगवायूचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करणे : २.८.२०२२ या दिवशी रात्री आजीची प्रकृती अधिकच खालावली. आजीला रक्तदाब आणि डोकेदुखी यांचा त्रास होता. त्या दिवशी तिला डोकेदुखी आणि उलटी यांचा पुष्कळ त्रास होत होता. त्यातच तिला अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती केले.
२. रुग्णाईत आजीला सोडून रामनाथी आश्रमात जाणे कठीण वाटणे आणि मनःस्थिती द्विधा होणे : मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका सेवेसाठी जाणार होते. मी आजीची सर्वांत मोठी आणि लाडकी नात असल्याने माझी आजीशी पुष्कळ जवळीक होती. आजीची स्थिती नाजूक होती. त्यामुळे तिला सोडून आश्रमात जाणे मला कठीण वाटत होते. माझी मनःस्थिती द्विधा झाली होती.
३. साधिकेच्या वडिलांनी साधिकेला रामनाथी आश्रमात जाण्यास सांगणे : त्या वेळी माझ्या बाबांनी (श्री. नितीन कांबळी यांनी) मला लगेच ‘सेवेसाठी जा’, असे सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘आम्ही सर्व जण आजीच्या समवेत आहोत. तुला रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली आहे. तू तेथे जाऊन सेवा शिकून ये.’’
४. रामनाथी आश्रमात असतांना आजीचे निधन झाल्याचे कळल्यावर मनात सकारात्मक विचार येऊन मन स्थिर होणे : ४.८.२०२२ या दिवशी मी रामनाथी आश्रमात पोचले. त्याच्या दुसर्या दिवशी, म्हणजे ५.८.२०२२ या दिवशी ‘आजीचे निधन झाले’, असे मला समजले. त्या वेळी मला पुष्कळ वाईट वाटले. तेव्हा देवाच्या कृपेने माझ्या मनात ‘आजीला आणखी शारीरिक वेदना भोगाव्या लागल्या असत्या. त्यामुळे तिला त्रास झाला असता. देवाने तिला त्या सर्व यातनांतून मुक्त केले’, असे सकारात्मक विचार आले. त्यामुळे माझे मन थोडे स्थिर झाले. आश्रमातील चैतन्यामुळे आणि साधकांच्या सहवासात राहिल्याने मला हे दुःख पचवणे थोडे सोपे गेले.
५. संतांचा लाभलेला सत्संग !
५ अ. संतांचे बोलणे ऐकून स्थिर रहाण्यासाठी बळ मिळणे : आश्रमात असतांना एकदा मला संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी मी त्यांना माझ्या मनाची स्थिती सांगितली. तेव्हा माझे बोलणे ऐकून संतांनी मला विचारले, ‘‘आता स्थिर आहेस ना ?’’ त्या वेळी मी ‘हो’ म्हणाले. तेव्हा ‘त्यांनी मला स्थिर रहाण्यासाठी बळ दिले’, असे मला वाटले.
५ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर त्यांनी डोळे मिटून दोन्ही हात वर करणे आणि ‘त्यांनी आजीला पुढची गती मिळण्याची वाट मोकळी केली’, असे एका साधकाने सांगणे : त्यानंतर मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘‘तुम्हीच आजीला सद़्गती द्या.’’ त्या वेळी सूक्ष्मातून गुरुदेवांनी डोळे मिटले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही हात वर केले. तेव्हा मला त्यांच्या त्या कृतीचा अर्थ कळला नाही. त्यानंतर मला सहसाधकाने सांगितले, ‘‘गुरुदेवांनी आजीला पुढची गती मिळण्याची वाट मोकळी केली.’’ तेव्हा मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.
६. सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी ‘गुरुदेव साधकांच्या समवेत कुटुंबाची काळजी घेतात’, असे सांगून कृतज्ञता व्यक्त करणे : मी घरी परत आल्यावर माझी सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याशी भेट झाली. मी त्यांना गुरुदेवांविषय आलेल्या अनुभूतीविषयी सांगितले. तेव्हा त्यांनाही गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. पू. (सौ.) जाधवकाकू म्हणाल्या, ‘‘आपल्या सर्वांना किती महान गुरु मिळाले आहेत ! ते केवळ साधकांचीच नव्हे, तर साधकांच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात.’’
आजीच्या मृत्यूच्या कठीण प्रसंगातही देवाने मला सावरले. त्या वेळी आश्रमात असल्याने मी त्या दुःखातून सहजतेने बाहेर पडू शकले. गुरुदेवांनी माझ्यावर केलेल्या कृपेसाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. निधी नितीन कांबळी, कर्णावती, गुजरात. (२६.९.२०२२)
आईच्या अंतिम समयी तिच्याकडून ‘परम पूज्य’, असा नामजप करवून घेणे आणि ‘नामजप केल्याने तिला वेदना सुसह्य झाल्या’, याबद्दल कृतज्ञता वाटणे : ‘माझ्या आईला अर्धांगवायूचा झटका आल्यावर तिला रुग्णालयात भरती केले. तिची प्रकृती नाजूक होती. तिला स्पष्टपणे बोलता येत नव्हते. तेव्हा मी तिच्या जवळ होतो. त्या वेळी देवाच्या कृपेने माझ्या मनात आईकडून नामजप करून घेण्याचा विचार आला. मी आईला म्हणालो, ‘‘आई, ‘परम पूज्य’ म्हण.’’ तेव्हा ती अस्पष्ट आवाजात ‘परम पूज्य’, असे म्हणाली. मी तिच्याकडून गुरुदेवांचे नाव काही वेळ उच्चारून घेतले. ‘आईच्या अंतिम समयी तिला गुरुदेवांचे नाव घ्यायला सांगून तिच्या वेदना सुसह्य करण्याचा आणि पुढची गती मिळण्यासाठी तिला साहाय्य करण्याचा देवानेच विचार दिला’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. नितीन कांबळी ((कै.) श्रीमती वनिता कांबळी यांचा मोठा मुलगा, वय ५४ वर्षे), कर्णावती, गुजरात. (२६.९.२०२२) |
(कै.) श्रीमती वनिता वसंत कांबळी (वय ८२ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. संदीप कांबळी ((कै.) श्रीमती वनिता कांबळी यांचा मधला मुलगा, वय ५० वर्षे), कर्णावती, गुजरात.
अ. ‘आईने आम्हा ३ भावांवर चांगले संस्कार केले. तिने आम्हाला कर्तव्य करत असतांना देवधर्मही करायला शिकवला.
आ. आईने अनावश्यक गोष्टींसाठी कधीही व्यय केला नाही. तिने आम्हाला काटकसर करण्याची शिकवण दिली.
इ. आम्हा ३ भावंडांचे एकत्र कुटुंब होते. आई सर्वांमध्ये मिळूनमिसळून रहात होती.
ई. कुटुंबामध्ये काही कठीण प्रसंग घडल्यावर ती नेहमी स्थिर रहात असे. ती सर्वांना सांभाळून घ्यायची.
उ. आई नियमितपणे नामजप करायची. शेवटच्या काही दिवसांत तिला वाटले, ‘आपला नामजप नीट होत नाही.’ तेव्हा तिने नामजप लिहून काढायचे ठरवले. तिच्या मनात ‘बर्याच वर्षांनी लिहिता येईल का ?’, असा विचार येऊनही तिने नामजप लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला नामजप लिहायला जमू लागले.’
२. सौ. नीलिमा नितीन कांबळी ((कै.) श्रीमती वनिता कांबळी यांची मोठी सून, वय ५३ वर्षे), कर्णावती, गुजरात.
अ. ‘आईंना (सासूबाईंना) शारीरिक आणि मानसिक त्रास होत असला, तरीही त्याविषयी त्या इतरांना सांगत नसत.
आ. त्यांनी मला मुलीसारखे वागवले.
इ. त्या लहान-थोर सर्वांचा आदर करायच्या.
ई. त्यांच्या माझ्याकडून कोणत्याही व्यावहारिक अपेक्षा नव्हत्या. त्यांना कशाचाही मोह नव्हता.’
३. कु. शुभम् कांबळी ((कै.) श्रीमती वनिता कांबळी यांचा नातू, वय २० वर्षे), कर्णावती, गुजरात.
अ. ‘आजी नियमितपणे सकाळी उठून देवाला नमस्कार आणि प्रार्थना करायची अन् नंतरच कामे करायला आरंभ करायची. ती रात्री देवाला प्रार्थना करूनच झोपायची.
आ. तिला शारीरिक त्रास असूनही ती स्वतःची कामे स्वतः करायची.
इ. आजीला सर्व कामे ठरलेल्या वेळेतच करायची सवय होती. तिच्यामुळेच आम्हा सर्वांना तशी सवय लागली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २६.९.२०२२)