सातत्य आणि स्वतःच्या चुकांविषयी गांभीर्य असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमातील श्री. पुंडलीक माळी (वय ६८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल नवमी (रामनवमी), ३०.३.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. पुंडलीक माळी यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त मला बाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. पुंडलिक माळी

१. सातत्य

अ. बाबांना पुष्कळ शारीरिक त्रास आहेत. त्यांनी लहानपणी पुष्कळ शारीरिक कष्ट केले आहेत, तरीही या वयामध्ये ते सकाळी ५.३० ते ६ वाजता उठतात आणि त्यांची दिनचर्या ठरल्याप्रमाणे चालू असते.

आ. आम्ही एक वर्षापूर्वी आश्रमात रहायला आलो. तेव्हा सौ. स्वाती शिंदे यांनी बाबांना व्यष्टी साधना आणि सेवा यांचे दिवसभराचे नियोजन करून दिले होते. दुसर्‍या दिवसापासून ते नियोजनाप्रमाणे कृती करू लागले आणि ते अजूनही तसेच करत आहेत.

कु. संध्या माळी

२. नामजप एकाग्रतेने करणे

बाबांना सांगितलेला नामजप ते पुष्कळ एकाग्रतेने करतात, तसेच त्यांना न्यास आणि मुद्रा करण्यास सांगितल्या आहेत. त्यासुद्धा ते भावपूर्ण करतात. ‘नामजप करतांना त्यांच्या मनात अन्य विचार नसतात’, असे त्यांनी सांगितले.

३. चुकांविषयी गांभीर्य असणे

अ. बाबा स्वतःच्या चुका शोधतात आणि कुणी चुका सांगितल्यास त्या मनापासून स्वीकारतात. ‘स्वतःमध्ये कसा पालट करता येईल ?’, याविषयी ते आमच्याशी बोलतात आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करतात.

आ. त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा परिणाम, त्यांचे स्वभावदोष आणि त्यावर करावयाची उपाययोजना, हे बाबांना स्वतःलाच लक्षात येते आणि त्याप्रमाणे ते लिहून काढतात.

४. आश्रमजीवन मनापासून स्वीकारणे

बाबांनी अल्पावधीतच आश्रमजीवनाविषयी शिकून घेतले. आश्रमातील जेवण आणि आमचे जेवण पुष्कळ वेगळे आहे, तरीही बाबांनी आश्रमात रहायला आल्यावर कधीही अन्य कोणता पदार्थ मागितला नाही.

५. बाबांमध्ये झालेले पालट

अ. बाबांना कधीही एखादी गोष्ट सांगितली, तर ते त्वरित करतात.

आ. पूर्वी त्यांच्या चेहर्‍यावर आवरण असल्याचे जाणवायचे; परंतु या काही मासांपासून त्यांच्या चेहर्‍यावर आवरण आल्याचे जाणवले नाही. आता त्यांची त्वचा पूर्वीपेक्षा उजळ झाली आहे.

इ. त्यांच्याकडे पाहून आनंदी आणि शांत वाटते.

६. बाबा जवळ असल्यावर ‘आम्हाला आध्यात्मिक लाभ होतात’, असे जाणवते.’

– कु. संध्या माळी (श्री. पुंडलीक माळी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक