१. विशेष भक्तीसत्संगाच्या दिवशी आनंद आणि थंडावा जाणवणे
‘१६.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त विशेष भक्तीसत्संग झाला. त्या दिवशी सकाळपासूनच मला पुष्कळ आनंद जाणवत होता. सत्संगाला आरंभ झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आज वातावरणात काय पालट जाणवत आहे ?’, असे विचारल्यावर ‘थंडावा अधिक आहे’, असा विचार माझ्या मनात आला.
२. ‘भक्तीसत्संगाच्या माध्यमातून १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडले’, या विचाराने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे
भक्तीसत्संगाच्या आरंभीच्या भागात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भगवान शिव आणि १२ ज्योतिर्लिंगे यांची महती सांगत असतांना मला त्यांच्याप्रती आतून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘आपण स्थुलातून ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही; म्हणून प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आज या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवले’, असा विचार मनात येऊन माझे मन कृतज्ञतेने भरून गेले.
३. ज्योतिर्लिंगांची महती विशद करणारे गीत ऐकतांना भावजागृती होणे
ज्योतिर्लिंगांची महती विशद करणारे गीत ऐकतांना माझा भाव जागृत झाला. ‘आपण त्या गीतासह ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करत आहोत’, असे मला जाणवले. शिवस्तुतीपर गीत ऐकतांना प्रत्येक शब्द आणि त्याचा भावार्थ माझ्या अंतर्मनापर्यंत जात होता. प्रत्यक्षात ‘आपण त्या गीतातून भगवान शिवाला आळवत आहोत’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. माझी ही भावस्थिती सायंकाळपर्यंत टिकून होती.
४. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आश्रमात शिवस्तुतीपर गीत ऐकल्यावर भक्तीसत्संगामध्ये अनुभवलेली भावस्थिती पुन्हा अनुभवणे
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आश्रमात शिवस्तुतीपर गीत ध्वनीक्षेपकावर ऐकल्यावर भक्तीसत्संगामध्ये अनुभवलेली स्थिती मला पुन्हा एकदा अनुभवता आली. ‘साक्षात् भगवान शिव समोर आहे आणि मी त्याच्या चरणांवर बिल्वपत्र अर्पण करत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझा भाव जागृत झाला. गीत संपल्यानंतरही माझी भावस्थिती बराच वेळ टिकून होती.’
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |