संगमेश्वर तालुक्यात भूमीचा गैरव्यवहार !
रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यात कुंडी, निगुडवाडी, कुचांबे ते ओझरे येथील भूमींचे गैरव्यवहार झाले आहेत. भूमीच्या मूळ मालकांना कोणतीही माहिती न देता कोकणातील ५ सहस्र एकर भूमी ए.टी.एल. (अदानी ट्रान्समिशन लिमिटेड) आस्थापनाला देण्यासाठी दलालांमार्फत बळकावण्यात आली आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. या भूमी व्यवहारांची चौकशी करून त्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. या वेळी संगमेश्वर तालुक्यातील आंगवली गावचे उपसरपंच दिनेश कांबळे आणि माजी सरपंच संतोष आणेराव उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले,
१. चंद्रपूर येथील अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या आस्थापनाला २८४ एकर जागा वन विभागाने दिली आहे. त्या बदल्यात आता कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील जागा वन विभागाला देण्यासाठी दलालांकडून भूमी खरेदी करण्यात आली. वर्ष २०१५ ते २०१८ या कालावधीत या भूमीची खरेदी विक्री झाली आहे.
२. कोकणातील गरीब शेतकर्यांच्या भूमी बळकावण्याचे काम समाजकंटकांनी चालू केले आहे. याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी.
३. पश्चिम घाटाच्या आजूबाजूला असलेली कुचांबे ते ओझरे या परिसरातील २० गावांमधील भूमी खरेदी विक्रीचे झालेले व्यवहार ताबडतोब रहित करावेत.
४. भूमी खरेदीचे हे प्रकार ताबडतोब न थांबल्यास कोकणवासियांना त्यांची भूमी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.