जुन्या पद्धतीनुसार निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांना जुन्या पद्धतीप्रमाणे निवृत्तीवेतन (पेन्शन) लागू करावे, या मागणीसाठी १४ मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले; मात्र त्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी चालू ठेवल्यामुळे गोंधळातच तारांकित प्रश्नोत्तरे घेण्यात आली.

तारांकित प्रश्नोत्तरांच्या वेळेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, आमदार अभिजीत वंजारी यांनी ‘जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी’, या मागणीचा स्थगन प्रस्ताव सभागृहात सादर केला. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी याविषयी सरकारची प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत चर्चा चालू असून तोडगा काढण्यात येत असल्याविषयी विरोधकांना आश्वस्त करत तारांकित प्रश्नोत्तरे घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. विरोधकांनी मात्र जुनी निवृत्ती वेतनावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. सभागृहत तहकूब केल्यानंतरही  विरोधकांनी सभापतींच्या आसनापुढील जागेत येऊन घोषणा चालू ठेवल्या. त्यापुढे पुढील कामकाज गोंधळात पार पडले.