सभागृहात मंत्री नसल्याने सभागृह स्थगित करण्याची नामुष्की येते ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेत लक्षवेधी सूचनांना उत्तर द्यायला मंत्री अनुपस्थितीत !

डावीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांची सिद्धता करून सदस्य सभागृहात येतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करून ते त्यांचे प्रश्न सभागृहात मांडतात; मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह स्थगित करण्याची वेळ येते ही गंभीर गोष्ट आहे. हे वारंवार घडत आहे. या प्रकरणी संबंधितांना कठोर शब्दांत समज देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
१४ मार्च या दिवशी सकाळी ९.३० ते १०.४५ या कालावधीत एकूण ९ लक्षवेधी सूचनांचा विषय होता; मात्र मंत्री उपस्थित नसल्याने त्या त्या प्रश्नाची लक्षवेधी सूचना सदस्यांना मांडता आली नाही. त्यामुळे अजित पवार यांनी हे सूत्र सभागृहात उपस्थित केले. या गोष्टीची विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर नोंद घेत मंत्री उपस्थित नसल्याविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच याची गंभीर नोंद घेण्याची सूचना सरकारला दिली.