आमदार प्रकाश सुर्वे-शीतल म्हात्रे ‘मॉर्फ’ व्हिडिओवरून सभागृहात गदारोळ !

विधानसभा प्रश्नोत्तरे…

विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित !

(‘मॉर्फ’ व्हिडिओ म्हणजे एका व्यक्तीच्या शरीराच्या एका भागाला दुसर्‍या व्यक्तीच्या शरीराचा भाग जोडणे यांसारखे किंवा आवाजात पालट करून व्हिडिओ बनवणे)

डावीकडून आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह ‘मॉर्फ’ व्हिडिओ ११ मार्च या दिवशी रात्री प्रसारित करण्यात आला होता. १३ मार्च या दिवशी या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. ‘हा व्हिडिओ कोणी ‘मॉर्फ’ केला ? याचा तात्काळ शोध घेऊन या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा. पहिला व्हिडिओ कोणी प्रसारित केला ? त्याचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. ‘याविषयी आम्हाला तात्काळ उत्तर हवे’, असा आग्रह सत्ताधारी सदस्यांनी धरला. सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरून गोंधळ घातल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.

शिंदे गटाच्या सदस्या यामिनी जाधव विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे सभागृहात शीतल म्हात्रे यांचे सूत्र उपस्थित करतांना म्हणाल्या की, अशाप्रकारे एखाद्या विवाहित महिलेची अपर्कीती केल्यास तिचा संसार मोडू शकतो. राजकारणातील भवितव्य उद्ध्वस्त होऊ शकते. आमदार अबू आझमी या वेळी प्रश्नोत्तरांच्या घंट्यांत सहभागी होण्यासाठी उभे राहिले असता ‘अबू आझमी तुम्हीही यात सहभागी आहात का ?’ असा प्रश्न भाजपच्या सदस्या मनीषा चौधरी यांनी उपस्थित केला.

या वेळी सभागृहात झालेल्या चर्चेत ‘हा ‘मॉर्फ’ व्हिडिओ प्रसारित करणार्‍यांचा भ्रमणभाषसंच जप्त करावा, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) स्थापना करावी, हा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या व्हॉट्सॲपवरील ‘ॲडमीन’वर (गट निर्माण कराणारा) गुन्हा नोंद करावा, अशा मागण्या सदस्या मनीषा चौधरी, सदस्या भारती लव्हेकर आणि यामिनी जाधव यांनी केल्या.

या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, विविध क्षेत्रांत काम करणार्‍या महिलांचे चारित्र्य चांगले ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही पक्षातील राजकीय नेते आणि महिला प्रतिनिधीविषयी अशा घटना घडू नये. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांची चौकशी करून ‘दूध का दूध पानी का पानी’ करावे.