आरे कॉलनीमधील अतिक्रमण हटवण्याविषयी समिती स्थापना होणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटन विकासमंत्री

मंगलप्रभात लोढा

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – आरे कॉलनीमध्ये भाड्याने देण्यात आलेल्या भूमीचे करार समाप्त होऊनही त्या जमिनी सोडण्यात आलेल्या नाहीत. हे अतिक्रमण हटवण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली. आमदार रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीमधील रस्ते आणि अन्य विकास कामे यांविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर पर्यटनमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

या वेळी रवींद्र वायकर यांनी आरे कॉलनीमधील ४५ किलोमीटरच्या रस्त्यांची दूरवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १७३ कोटी रुपयांचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे; मात्र या कामांना स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगितले. यावर मंगलप्रभात लोढा यांनी कामांची स्थगिती उठवण्याविषयी १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘आरे कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल’, असे सांगितले.