मुंबई, १० मार्च (वार्ता.) – विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला होता. या योजनेचे प्रारूप सिद्ध करून येत्या १५ दिवसांत ही योजना लागू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
वर्ष २०१८ मध्ये विद्यार्थिनी आणि महिला यांना सॅनिटरी पॅड देण्याची चालू केलेली योजना बंद झाली आहे. ही योजना पुन्हा चालू करण्याविषयी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर गिरीश महाजन यांनी वरील माहिती दिली. यावर गिरीश महाजन यांनी राज्यातील १९ लाख विद्यार्थिनी आणि बचतगटातील २९ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्ष २०२२ मध्ये ही योजनेचा कालावधी संपला आहे. राज्यशासनाकडून ही योजना पुन्हा चालू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाकडून २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी आमदार भारती लव्हेकर यांनी रेशनच्या दुकानांवर सॅनिटरी पॅड विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर ‘गिरीश महाजन यांनी यावर सरकार सकारात्मक निर्णय घेऊ’, असे सांगितले.