पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवली जात असून त्याच्या स्फोटात मुख्यमंत्री मान आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय हत्या होईल ! – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नू याची धमकी !

खलिस्तानी आतंकवादी गुरुपतवंत सिंह पन्नू

नवी देहली – केंद्र आणि पंजाब सरकारने पंजाबमधील शेकडो घरांमध्ये पोलीस पाठवले होते. लोकांचा छळ आणि महिलांचा विनयभंग झाला. पंजाबच्या प्रत्येक घरात स्फोटके बनवली जात आहेत. लोकांना पाहिजे तेव्हाच याचा स्फोट होईल. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री शहा आणि पंजाबचा मुख्यमंत्री भगवंत मान यांचा राजकीय मृत्यू होईल, अशी धमकी ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने दिली आहे. त्याने ४ मार्च या दिवशी सकाळी पंजाब आणि हरियाणा यांच्या शंभू सीमेवर खलिस्तानच्या समर्थनासह ‘जी-२०’ देशांच्या प्रतिनिधींचे खलिस्तानमध्ये स्वागत’, असे फलक लावले आहेत. या फलकांविषयी पन्नू याने म्हटले आहे की, शंभू सीमेवर लिहिलेली घोषणा हा भारताला संदेश आहे. आता पंजाब आणि हरियाणा भारताचा भाग नसून तो खलिस्तान आहे.

१. पन्नू याने पंजाबमधील तरुणांना १५ आणि १६ मार्च या दिवशी ‘जी-२०’साठी येणार्‍या प्रतिनिधींना खलिस्तानचा संदेश देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

२. पन्नूच्या धमकीपूर्वीच पंजाबमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर १५ ते १७ मार्च या काळात पंजाबमधील सुरक्षेसाठी अमृतसरमध्ये ५० केंद्रीय पोलीस दलांना पाचारण करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

खलिस्तान्यांची देशद्रोही चळवळ आता चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !