५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे (वय ९ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. अर्णव भणगे हा या पिढीतील एक आहे !

(अर्णव या नावाचा अर्थ : समुद्र, अंतरिक्ष)

उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला कु. अर्णव भणगे याची त्‍याची आई आणि आजी यांच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे देत आहे.

कु. अर्णव भणगे

१. जन्‍मापूर्वी

१ अ. भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप होणे : ‘माझ्‍याकडून गर्भारपणात कुलदेव श्री ज्‍योतिबा आणि कुलदेवी श्री महालक्ष्मीदेवी यांना ‘माझ्‍या पोटी सात्त्विक जीव जन्‍माला येऊ दे. त्‍या जिवाच्‍या माध्‍यमातून माझी आणि माझ्‍या कुटुंबियांची साधना चांगली होऊ दे. त्‍याला  राष्‍ट्ररक्षण, धर्मजागृती आणि धर्मप्रसार याची आवड राहून त्‍याच्‍या सहभागातून आमच्‍याकडूनही धर्मजागृती अन् धर्मप्रसार यांचे कार्य होऊ दे’, अशा साधनेला पूरक प्रार्थना होत असत. माझ्‍या अन्‍य देवांच्‍या चरणीही प्रार्थना होत असत.

१ आ. मी गर्भारपणात पुष्‍कळ आनंदी असायचे.

१ इ. मी प्रतिदिन देवघरासमोर बसून पोटावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप न्‍यूनतम ६ माळा करत असे. मी केलेला ‘नामजप देवापर्यंत पोचत आहे’, असे मला जाणवत असे.

१ ई. विविध सेवा करणे : मला धर्मरथावर सेवेची संधी मिळाली. मला ‘धर्मरथ गुरुदेवांचा देवदूत आहे’, असे वाटत असे. त्‍या कालावधीत धर्मरथावर सेवा करतांना माझ्‍याकडून ग्रंथवितरण चांगले व्‍हायचे. त्‍या तुलनेत मी गरोदर नसतांना कधी इतके ग्रंथवितरण झाले नाही. गर्भारपणाच्‍या कालावधीत मला अनेक हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या निमित्ताने सेवा करता आल्‍या. गुरुकृपेने सगळ्‍या सेवा निर्विघ्‍नपणे पार पडल्‍या. हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत दिल्‍या जाणार्‍या घोषणा ऐकून मला आनंद होत असे. त्‍या वेळी मला गर्भाच्‍या हालचाली जाणवत असत.

१ उ. गर्भारपणात चुका स्‍वीकारण्‍याच्‍या वृत्तीत वाढ होणे : एकदा हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या सेवेनंतर एका साधिकेने माझ्‍या सेवेतील चुका सांगितल्‍या. तेव्‍हा मी सर्वांच्‍या पुढे उभी राहून चुका स्‍वीकारल्‍या; मात्र मला गर्भधारणा होण्‍यापूर्वी त्‍याच साधिकेने स्‍वभावदोष निर्मूलन सत्‍संगात माझ्‍या चुका सांगितल्‍यावर त्‍या माझ्‍याकडून कधीच स्‍वीकारल्‍या गेल्‍या नव्‍हत्‍या.

१ ऊ. माझी प्रसुती होण्‍याच्‍या दोन दिवस आधी माझ्‍याकडून देवाला पुष्‍कळ प्रार्थना झाल्‍या. मी गर्भाशी बोलत होते. मी सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत होते.

२. जन्‍मानंतर

सौ. अश्‍विनी भणगे

२ अ. जन्‍म ते ११ मास

१. बाळाची जन्‍मपत्रिका बनवून घेतल्‍यावर ज्‍योतिषांनी सांगितले, ‘‘श्रीकृष्‍णाच्‍या जन्‍मपत्रिकेसारखी बाळाची जन्‍मपत्रिका आहे आणि ‘वासुदेव’ हे नाव येत आहे.’’

२. आमच्‍या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक घ्‍यायला येणारे सगळे साधक बाळाला पहायचे. तेव्‍हा ते ‘‘बाळ पुष्‍कळ सात्त्विक आहे’’, असे सांगत असत.

३. सात्त्विक व्‍यक्‍ती किंवा साधक बोलत असतांना बाळ त्‍यांना हुंकार देऊन प्रतिसाद देत असे.’

– सौ. अश्‍विनी रवींद्र भणगे (कु. अर्णवची आई), देहली

४. ‘अर्णवला अंघोळ घातल्‍यानंतर त्‍याच्‍या चेहर्‍यावर दैवी कण दिसायचे.’ – सौ. वत्‍सला बबनराव भोसले (अर्णवची आजी (आईची आई), वय ६६ वर्षे), चिंचवड, पुणे

२ आ. वय ११ मास ते १ वर्ष

२ आ १. शांत आणि आनंदी : ‘अर्णव ११ मासांचा असतांना आम्‍ही देहली येथे रहायला आलो. तेव्‍हा त्‍याने नवीन शहरातील वातावरण आणि हवामानातील पालट यांना सामोरे जातांना कधी त्रास दिला नाही. त्‍याने आम्‍हाला रात्री कधी उठवले नाही. तो सकाळी उठल्‍यावर शांत, आनंदी आणि समाधानी असायचा. त्‍याचा प्रसन्‍न चेहरा पाहून आम्‍हाला आनंद होत असे.

२ इ. वय १ ते ५ वर्षे

२ इ १. समाधानी वृत्ती : त्‍याने स्‍वतःसाठी खेळणी घेण्‍यासाठी कधी हट्ट केला नाही. आम्‍ही त्‍याला जी खेळणी आणून देत होतो, त्‍यांच्‍याशी तो एकटाच खेळत असे. त्‍याने लहानपणी खेळतांना त्रास दिला नाही.

२ इ २. देवाची ओढ : त्‍याला सनातन-निर्मित देवतांची ‘लॅमिनेटेड’ चित्रे हातात घ्‍यायला आवडायचे.

२ इ ३. समंजस : शेजारी आणि समाजातील व्‍यक्‍ती स्‍वतःहून आम्‍हाला सांगायचे, ‘‘हा मुलगा पुष्‍कळ शांत आहे. तो त्रास देत नाही.’’ वर्ष २०१८ मध्‍ये मला नोकरी लागल्‍यावर त्‍याला पाळणाघरात रहावे लागले. तेव्‍हा त्‍याने आम्‍हाला आणि तेथील लोकांना त्रास दिला नाही. आम्‍ही कधी कधी नोकरीहून रात्री ८ – ९ वाजता घरी येत असू. तेव्‍हा तो आमची वाट पहात असे. आम्‍ही घरी आल्‍यानंतर तो शांतपणे आमच्‍याशी बोलत असे.’

– सौ. अश्‍विनी रवींद्र भणगे

२ ई. ५ वर्षानंतर

२ ई १. ‘तो प्रत्‍येकाशी लवकर मैत्री करतो.

२ ई २. त्‍याला खाण्‍याची आवड-नावड नाही.’

– सौ. वत्‍सला बबनराव भोसले

२ ई ३. ‘तो कुलदेवता आणि श्री गणेश यांचा नामजप करतो.

२ ई ४.  सेवेची आवड : तो माझ्‍या समवेत जिज्ञासूंना संपर्क करण्‍यासाठी येतो. मी सेवा करतांना तो मला सेवेत साहाय्‍य करतो.

२ ई ५. आश्रमात रहाण्‍याची ओढ : तो माझ्‍या समवेत हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा, सत्‍संग सोहळा किंवा गुरुपौर्णिमा अशा सोहळ्‍यांच्‍या वेळी येतो. एकदा मी त्‍याला सांगितले, ‘‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या निमित्त ‘आपण १ दिवस देहली सेवाकेंद्रात राहूया का ? तिथे तुला दूरचित्रवाहिन्‍यांवरील कार्यक्रम पहायला मिळणार नाहीत.’’ तेव्‍हा तो म्‍हणाला, ‘‘चालेल. ‘मला आश्रमात रहावे’, असे वाटत आहे. मी त्रास देणार नाही.’’

२ ई ६. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव असणे आणि रामनाथी आश्रमात असतांना ‘ते समवेत आहेत’, असे जाणवणे : आम्‍ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍यापूर्वी अर्णवला गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटण्‍याची पुष्‍कळ ओढ लागली होती. त्‍याला ‘कधी एकदा गुरुदेवांना भेटतो आणि त्‍यांच्‍याशी बोलतो’, असे झाले होते. त्‍याला गुरुदेवांना भेटल्‍यानंतर पुष्‍कळ आनंद झाला. गुरुदेवांची भेट झाल्‍यानंतर रामनाथी आश्रमात असतांना त्‍याला स्‍वप्‍नात गुरुदेवांचे दर्शन होत असे. त्‍याला आश्रमात गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत असे. तो मला म्‍हणाला, ‘‘आपण नेहमी रामनाथी आश्रमात येत राहू.’’

– सौ. अश्‍विनी रवींद्र भणगे

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (११.९.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.