-
म्हादई जलवाटप तंटा
-
माजी ॲटर्नी जनरल पराशरन मांडणार बाजू
पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – म्हादईवर धरणाचे बांधकाम करून पाणी वळवू पहाणार्या कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्याचा विचार ‘म्हादई बचाव अभियान’ने चालवला आहे. माजी ॲटर्नी जनरल के.के. पराशरन ‘म्हादई बचाव अभियान’ची बाजू मांडण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ अधिवक्ता भवानीशंकर गडणीस यांनी दिली आहे. अधिवक्ता भवानीशंकर गडणीस यांनी याविषयी महाधिवक्ता (ॲटर्नी जनरल) के.के. पराशरन यांच्याशी चर्चा केली आहे.
गोवा शासनाच्या वतीने सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या प्रकरणात वर्ष २००६ मध्ये के.के. पराशरन यांनी गोव्याची बाजू मांडली होती आणि नंतर वर्ष २०१० मध्ये राज्य शासनाशी मतभेद झाल्याने त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली होती. वर्ष २०१२ मध्ये म्हादईप्रश्नी लवाद स्थापन झाल्यानंतर गोवा शासनाने त्याची याचिका मागे घेतली होती. अधिवक्ता भवानीशंकर गडणीस म्हादईप्रश्नी न्यायालयीन लढ्याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘कर्नाटक सरकारने एक दगड हालवला किंवा झाड कापले, तरी आम्ही वर्ष २०१७ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निवाड्याचा अवमान केल्यावरून न्यायालयात जाणार आहोत. पर्यावरण अनुज्ञप्ती घेण्यासाठी पर्यावरण खात्याकडे जाणार्या कर्नाटक शासनाला रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ प्रविष्ट केले जाणार आहे.’’
म्हादईचा लढा हे आमच्यासाठी युद्धच ! – मावीन गुदिन्हो, मंत्री
पणजी – म्हादईचा लढा हे आमच्यासाठी युद्धच आहे. या प्रश्नावर गोव्यात कुणीही राजकारण करू नये. ‘म्हादईप्रश्नी आम्ही सर्व एक आहोत’, असे आम्ही दाखवून दिले पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सध्या निवडणूक ‘मूड’मध्ये आहेत. प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सर्व काही क्षम्य असते. मुख्यमंत्री बोम्मई यांची विधाने ही अशा स्वरूपाची असल्याचे आम्ही मानतो, असे विधान गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हादईप्रश्नी गोवा विधानसभेत म्हादई सभागृह समितीने घेतलेल्या ठरावाला किंमत नसल्याचे आणि कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटक यापुढेही चालू ठेवणार असल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.
गोवा विधीमंडळमंचची २७ जानेवारीला बैठक
गोवा विधीमंडळ मंचची म्हादई आणि भूमीपासून मिळणारा महसूल या सूत्रांवरून २७ जानेवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता विधानसभा संकुलात बैठक होणार आहे. ‘गोवा विधीमंडळ दिवस-२०२३’च्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦