शनिवारवाड्याचे वैभव !

आज, माघ शुक्‍ल ३ या तिथीला शनिवारवाड्याच्‍या बांधकामास प्रारंभ झाला. त्‍या निमित्ताने…

पुण्याचे वैभव – ‘शनिवार वाडा !’

‘शके १६५१ च्‍या माघ शुक्‍ल ३ या दिवशी पुणे येथे पहिल्‍या बाजीराव पेशवे यांच्‍या कारकीर्दीत प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्‍या बांधकामास प्रारंभ झाला. बाजीराव पेशवे हे मधून मधून पुण्‍यास येत असे, तेव्‍हा त्‍यांचा मुक्‍काम कसब्‍यातील धडफळे यांच्‍या वाड्यात असे. शके १६५० मध्‍ये पुरातन नदी किनार्‍याजवळ असलेला कोट बाजीरावांनी पाडून मैदान केले आणि कारभारी वगैरे लोकांस घरे बांधण्‍यास जागा दिली. पूर्वेच्‍या बाजूस दोन गावे होती ती मोडून कसबा भाग केला. हा कसबा छत्रपती शाहूंनी पेशव्‍यांना इनाम (बक्षीस) म्‍हणून दिला. पुढे शके १६५१ मध्‍ये मावळ वेशीजवळ जागा घेऊन वाडा बांधावयास आरंभ केला. या वाड्यांत जयपूर येथील कारागिरांकडून भिंतीवर सुंदर चित्रे बाजीरावांनी काढून घेतली. प्रथमच्‍या इमारतीत २ मजले आणि २ चौक होते. पुढे नानासाहेब पेशवे यांनी त्‍यात अनेक फेरफार करून तो मोठा केला. काही भागाचे ६ मजले करून ४ चौक केले. चौकामध्‍ये कारंजी होती. सभोवतीचा कोट नानासाहेबांनी वर्ष १७५५ मध्‍ये बांधला तो अद्याप आहे.

महाराष्‍ट्रांतील सर्व मोठ्या वाड्यांप्रमाणे शनिवारवाड्याचे तोंडही उत्तरेकडे आहे. त्‍यास ‘दिल्ली दरवाजा’ असे नाव होते. मराठे सरदारांची दृष्‍टी नेहमी उत्तरेस देहलीवर खिळून राहिलेली असायची. शिवशाहीच्‍या पूर्वीपासूनच समर्थ रामदासस्‍वामी बलशाली दैवत हनुमानालाही हीच प्रार्थना करतात, ‘कोटिच्‍या कोटि उड्डाणे झेपावे उत्तरेकडे ।’ शनिवारवाडा सागवानी लाकडाचा असून आतील नक्षीचे काम प्रेक्षणीय होते. ‘शनिवारवाडा इंद्रप्रस्‍थ येथील पुराणप्रसिद्ध वाड्याचे बरहुकूम (त्‍याप्रमाणे) बांधला आहे. वाड्यातील कारंजांपैकी कमलाकृती कारंजे हिंदुस्‍थानात सर्वांत मोठे असून त्‍या कल्‍पनेचा उगमही भारतीयच आहे’, असा उल्लेख या वाड्यासंबंधी सापडतो. याच शनिवारवाड्यातून मराठ्यांचे राजकारण चालत असे. येथे अनेक ऐतिहासिक संस्‍मरणीय अशा घटना घडल्‍या.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्‍हाद नरहर जोशी)