सोलापूर येथे आयकर विभागाकडून व्यावसायिकांवर धाडी !

५० कोटी रुपयांची करचोरी उघड 

सोलापूर – येथील ३ व्यावसायिक संस्थांवर आयकर विभागाने मागील ४ दिवसांत केलेल्या पडताळणीनंतर ५० कोटी रुपयांचे बोगस गैरव्यवहार आढळून आले आहेत. सोलापूर-भाग्यनगर महामार्गावर असलेल्या मुळेगाव रस्त्यावरील सोनांकुर पशूवधगृहासह (सोनांकुर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड बीफ एक्सपोर्ट आस्थापन), आसरा चौक, कुमठा नाका, तसेच भाग्यनगर रस्त्यांवरील भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने ४ दिवस धाडी टाकल्या आहेत.

करचोरी करणार्‍या व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या विरोधात कारवाई करत रोखीने आणि कच्च्या कागदांवर झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केली आहेत. मागील २ मासांपूर्वी आयकर विभागाने शहरातील विविध रुग्णालयांवर केलेल्या धाडीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरप्रकार समोर आला होता. नव्याने टाकलेल्या धाडींमध्ये व्यावसायिकांनी भंगार, साहित्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात रोखीने खरेदी करत टॅक्स चुकवला असल्याची माहिती समोर येत आहे. (असे कसे होते ? यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? याचाही शोध घ्यायला हवा आणि त्यातील पळवाटा बंद करायला हव्यात ! – संपादक)