सातारा, ५ डिसेंबर (वार्ता.) – सातारा नगरपरिषदेच्या सीमेतील मिळकतींच्या चतुर्थ वार्षिक पाहणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीमा भागातील मिळकतींनाही नगरपरिषद सीमेमध्ये समाविष्ट केल्यापासून अधिनियमातील कलमांप्रमाणे प्रथमवर्षी २० टक्के वाढीव कर आकारणी केली जाईल. कर आकारणीविषयी समज-अपसमज पसरवले जाण्याची शक्यता आहे. आम्ही स्वत: या प्रक्रियेचा आढावा घेत आहोत. कुणावरही जीझिया करासारखी कर आकारणी होणार नाही, याची सातारावासियांनी निश्चिती बाळगावी, असे आश्वासन सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
खासदार भोसले पुढे म्हणाले की, नगरपरिषदेच्या स्तरावर अनेक प्रकल्पांची लोकवर्गणी भरायची असते. विविध विकासकामांसाठी स्वत:चा निधी लागतो. स्वनिधी म्हणून मिळकतकर हेच नगरपरिषदेचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मिळकतधारकांची घटपट्टी भरण्यास कधीच ना नसते; मात्र काही मंडळी कशाचे भांडवल करून सामान्य सातारावासियांची माथी भडकवतील, हे सांगता येत नाही. सातारावासियांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत अवाजवी कर आकारणी होणार नाही.