नागोठणे (रायगड) येथील सनातनचे साधक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विजय (नाना) विष्णु वर्तक (वय ७७ वर्षे) यांचे कार्तिक कृष्ण प्रतिपदा (९.११.२०२२) या दिवशी निधन झाले. १८.११.२०२२ या दिवशी कै. विजय (नाना) वर्तक यांचा निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अभय वर्तक, सून सौ. रूपाली वर्तक आणि मुलगी सौ. श्रावणी फाटक यांना त्यांची निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. अभय वर्तक (विजय (नाना) वर्तक यांचा मुलगा)
१ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे नानांसाठी नामजपादी उपाय शोधत असतांना नानांच्या कुठल्याच चक्रावर (षट्चक्रे आणि सहस्रार यांवर) स्पंदने न जाणवणे आणि लगेच ‘नानांचे निधन झाले’, असा निरोप येणे : ‘नानांची (वडिलांची) प्रकृती गंभीर आहे’, असे कळल्यावर देवद येथे सद्गुरु राजेंद्र शिंदे नानांसाठी नामजपादी उपाय शोधत होते. तेव्हा ते ‘नानांच्या कुठल्या चक्राच्या जागी अडथळा आहे’, हे पहात असतांना त्यांना नानांच्या कुठल्याच चक्रावर स्पंदने जाणवली नाहीत. त्यानंतर लगेचच ‘नानांचे निधन झाले’, असा निरोप आला.
१ आ. ‘वडिलांचे अखेरचे दर्शन घेता येणे आणि पुढील कार्य करता येणे, हे देवाचे नियोजन आहे’, असे वाटणे : ‘८.११.२०२२ पर्यंत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होतो. ८.११.२०२२ या दिवशी रात्री माझे एका सेवेनिमित्त देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात जाण्याचे नियोजन झाले. ९.११.२०२२ या दिवशी मी देवद आश्रमात पोचलो. वडिलांच्या निधनाची वार्ता कळल्यावर तिथून नागोठणे जवळ असल्यामुळे मला लगेच घरी जाता आले आणि मला वडिलांचे अखेरचे दर्शन घेता आले. मी पुढील सर्व कार्यही करू शकलो. या प्रसंगातून ‘हे सर्व देवाचे नियोजन आहे’, हे माझ्या लक्षात आले.
१ इ. नानांच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती
१. वडिलांचे निधन झाल्याचे कळल्यावरही माझे मन स्थिर होते.
२. नानांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘ते निश्चिंत मनाने शांत झोपले आहेत’, असे मला वाटले.
३. ‘घरात कुणाचे निधन झाले आहे’, असे न वाटता घरात चांगले वाटत होते.
४. घरात कोणताही दाब जाणवत नव्हता.
२. सौ. रूपाली वर्तक (विजय (नाना) वर्तक यांची सून)
२ अ. ‘सासर्यांच्या निधनाच्या दिवशी पहाटे यजमान (श्री. अभय वर्तक) गोवा येथून पनवेल येथे येणे’ हे दैवी नियोजन आहे’, असे मला वाटले.
२ आ. नानांनी केलेले लिखाण त्यांच्या निधनापूर्वी ४ – ५ दिवस आधी पाठवूनही दैवी संकेत मिळाल्याप्रमाणे त्यांच्या निधनापूर्वी ते लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होणे : नानांनी काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पाठवण्यासाठी मला लिखाण दिले होते. काही कारणांनी ते माझ्याकडून पुढे पाठवायचे राहिले. नंतरही अन्य काही गोष्टींमुळे त्याचे टंकलेखन आणि संपादकीय संस्करण झाले नव्हते. नानांचे निधन होण्यापूर्वी ४ – ५ दिवस आधी ती सर्व प्रक्रिया देवानेच माझ्याकडून पूर्ण करून घेतली आणि माझ्याकडून ते लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पाठवले गेले. नानांनी केलेले लिखाण प्रसिद्ध करण्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नसूनही नानांच्या निधनापूर्वी ते लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झाले. देवाच्या कृपेने त्यांच्या निधनापूर्वी १ दिवस आधी ते प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना स्वतःला ते लिखाण पहाता आले.
२ इ. नानांच्या निधनानंतर झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना
१. घराच्या मागच्या दाराबाहेर भारद्वाज पक्षी आणि मुंगूस आले.
२. आमच्या घराजवळ छोटे पक्षी नेहमी यायचे. त्या पक्ष्यांवर नानांचा पुष्कळ जीव होता. त्यांतील एका पक्ष्याने नानांच्या निधनाच्या दिवशी साधारण त्याच वेळी प्राणत्याग केल्याचे दिसून आले.
३. सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक (विजय (नाना) वर्तक यांची मुलगी)
३ अ. ‘माझे वडील या सर्व मोहमायेतून कधीच मुक्त झालेले होते’, असे मला जाणवले.
३ आ. नानांच्या निधनानंतर त्यांच्या शरिरात जाणवलेले पालट
१. नानांची अंगकांती पुष्कळ तजेलदार दिसत होती आणि चमकत होती. त्यांचे शरीर निश्चल असूनही चैतन्यमय जाणवत होते.
२. त्यांच्या शरिरावर वृद्धापकाळाच्या सुरकुत्या दिसत नव्हत्या.
३. त्यांच्या चेहर्यावर निश्चिंतता दिसत होती.
४. नानांचे निधन सकाळी ७ वाजता झाले. सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कारासाठी नेतांना त्यांचा देह जड झाला नव्हता.
५. त्यांच्या शरिरात कोणतेही नकारात्मक पालट झाले नव्हते. दहा घंट्यांच्या कालावधीत त्यांचे शरीर जसेच्या तसे होते.
३ इ. अनुभूती
१. नानांच्या निधनानंतर घरात कोणताही दाब किंवा नकारात्मक स्पंदने जाणवली नाहीत.
२. मला घराच्या मागील अंगणात २ फुलपाखरे बागडतांना दिसली. त्या वेळी ‘जणूकाही ती त्यांचे दर्शन घेण्यासाठी आली आहेत’, असे मला वाटले.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १५.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |